मुंबई नगरी टीम
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर राज्यात भाजप नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले होते.यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.अर्णब भाजपचा कार्यकर्ता असल्यासारखेच काल आंदोलन सुरू होते. मात्र अर्णब प्रकरणी दिल्लीत पडद्यामागे काय हालचाली सुरू होत्या हे सत्य मी जर मांडले तर सर्वांना पळता भुई थोडी होईल, असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.त्यामुळे अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर दिल्लीत नेमक्या काय हालचाली झाल्या? यावर आता चर्चा रंगली आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना अर्णबसाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप नेत्यांचा निषेध केला आहे. संबंधित प्रकरणात अर्णबला पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.यावरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.यावर प्रश्न विचारण्यात आला असता,अर्णब गोस्वामीची न्यायालयीन कोठडी आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा काय संबंध?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. अर्णब गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नाही तर ते रस्त्यावर उतरले नसते. कदाचित त्यांच्या पक्षाचा हा राष्ट्रीय कार्यक्रम असेल, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.
अन्वय नाईक हे मराठी होते. अर्णबच्या स्टुडिओचे काम नाईक यांनी केले होते. मात्र त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. या धक्क्याने त्यांच्या आईही गेल्या. त्यामुळे भाजपने आंदोलन करण्यापूर्वी या मराठी कुटुंबावर के संकट कोसळले होते, हे पाहायला हवे होते, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, बुधवारी अर्णब गोस्वामीला अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यासह दिल्लीतील भाजप नेते आक्रमक झाले होते. तर ठाकरे सरकार सूडबुद्धीने अर्णबवर कारवाई करत असल्याचा आरोपही भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता.