अनिल देशमुखांच्या घरावर ईडीने टाकलेल्या धाडीवर काय म्हणाले शरद पवार ?

मुंबई नगरी टीम

पुणे । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील आणि नागपूर मधील घरांवर आज ईडीने छापा टाकल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले.

पुण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला त्यावेळी पवार बोलत होते.माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत.यावर पवार यांनी भाष्य केले आहे.केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून, आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही, असे पवार यांनी सांगितले.ईडी वगैरे आम्हाला नवीन नाहीत.कारवाई होणारे देशमुख काही पहिले नाहीत, आत्ताच्या केंद्रातील राज्यकर्त्यांनी अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा दाखवला आहे.त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही. देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती.पण त्यातून त्यांच्या हातीकाहीही लागले नाही.त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का ? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे असा टोला लगावतानाच, त्याची चिंता करण्याचे आम्हाला काही कारण नाही,असेही पवार म्हणाले.

आपल्याला जो विचार मान्य नाही तो विचार दडपण्यासाठी अशा यंत्रणा वापरून केला जातो.हे काही नवीन नाही.अनेक राज्यांत आणि महाराष्ट्रात आपण यापूर्वी असे पाहिले नव्हते.मात्र केंद्रातील सत्ता यांच्या हातात आल्यापासून या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. पण याचा काही परिणाम होणार नाही. लोक देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नाही, असे पवार यांनी सांगितले.यावेळी पवार यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवरही मत व्यक्त केले. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:ची संघटना वाढवण्याचा अधिकार असून, कार्यकर्त्यांची उमेद वाढावी यासाठी सर्व जण अशी भूमिका घेतात.त्यासाठी काँग्रेस असे काही प्रयत्न करत असेल, तर त्यांचे आम्ही स्वागत करतो, हा प्रयत्न त्यांनी अवश्य करावा, असे पवार म्हणाले.

Previous articleभाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट,केली महत्वाची मागणी
Next articleमुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची २६ जुलै अंतिम तारीख