आधी अमित शाहांचा राजीनामा घ्या,यशोमती ठाकूर कडाडल्या

मुंबई नगरी टीम

अमरावती : पोलीस मारहाण प्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.मात्र भाजपला माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा.नंतर माझ्याकडे राजीनामा मागा,असे प्रत्युत्तर यशोमती ठाकूर यांनी दिले आहे.चंद्रकांत पाटील यांनी तिवसा येथे आंदोलन करत यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

यावर यशोमती ठाकूर यांनी टीका करत चंद्रकांत पाटील यांचे हे आंदोलन केविलवाणे असल्याचे म्हटले आहे. यावर अधिक बोलताना त्या म्हणाल्या, माझ्यावर लावलेले गुन्हे राजकीय आकसापोटी आहेत. परंतु कलम ४२०, ३०७, ३०२ अंतर्गत गुन्हे दाखल असलेले भाजपचे नेते मोकाट फिरत आहेत. त्यामुळे त्यांनी आधी अमित शाह यांचा राजीनामा मागावा, नंतर माझा राजीनामा घ्यावा. भाजपला माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी सुनावले आहे.

पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण प्रकरणी यशोमती ठाकूर यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेतून दिलासा मिळाला आहे. मात्र यशोमती ठाकूर जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. तसेच यशोमती ठाकूर यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यास काँग्रेस सरकार आपला पाठिंबा काढून घेईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटत असल्याने ते राजीनामा घेत नाहीत, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

Previous articleअर्णब प्रकरणी दिल्लीतील पडद्यामागील सत्य बाहेर काढलं तर सर्वांना पळता भुई थोडी होईल
Next articleराज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही ? ; आरोग्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा