मुंबई नगरी टीम
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. भाजप कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला असून त्यावर शिवसेनेने आता प्रतिक्रिया दिली आहे.शिवसेना खासदर संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेवर भेसळयुक्त भगवा कधीच फडकणार नाही,असे म्हणत भाजपला फटकारले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असेही त्यांनी सूचित केले.
बिहारची सत्ता हाती आल्यानंतर भाजप आता मुंबईत ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासाठी २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन मुंबई’ सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बुधावरी मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधता महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवण्याचा निर्धार केला. याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत,त्यामुळे त्यांनी पक्षासाठी अशी भूमिका घेणे योग्य आहे. मुंबई महापालिकेवर सध्या फडकणार भगवा हा शुद्ध नाही आणि ते घेऊन येणार भगवा शुद्ध आहे, असे जर त्यांना वाटत असेल तर त्याचा निर्णय जनताच घेईल.मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. मुंबईवर आलेल्या संकटावेळी इथला मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. रक्त सांडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ज्यांना शुद्ध भगवा फडकवायचा आहे त्यांनी हा इतिहास चाळावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब यांची भगव्यासंदर्भातील भूमिका अतिशय तीव्र होती. त्यामुळे जर भेसळयुक्त भगवा असेल तर तो महापालिकेवर कधीच फडकणार नाही. आज जो भगवा आहे तो कधीच उतरला नाही. मात्र तुम्ही हा भगवा उतरवण्याची तयारी करत आहात. याचा अर्थ तुम्हाला एकप्रकारे ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचा आहे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच भाजपला मुंबईमुळे मनपात रस आहे. इथल्या उद्योग, आर्थिक उलाढालीत त्यांना रस आहे. मुंबईला दिल्लीची पायपुसणी करायची आहे, मात्र आम्ही ते होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे संगीतले. तर त्यांना मुंबई विकायची आहे, ओरबाडायची आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र शंभर पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरच्या भगव्याला हात लावण्याची तुमची हिंमत नाही, अशा शब्दांत यांनी भाजपला खडसावले आहे.