वाढीव वीज बिलावरून सरकार विरूद्ध मनसे सामना रंगणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : वाढीव वीज बिलासंदर्भात राज्य सरकारने जनतेची पुन्हा निराशा केली असून याबाबत लोकांमध्ये संतापाची भावना आहे.या पार्श्वभूमीवर मनसेही आता आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे. मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा सुचक इशारा सरकारला दिला आहे.त्यामुळे वाढीव वीज बिलांमध्ये दिलासा न मिळाल्यास मनसेचा संघर्ष अटळ असण्याची दाट शक्यता आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण “लाथो के भूत बातों से नही मानते”, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील वीज बिल भरणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तर सरकारमध्ये हिंमत असेल ते वीज बिल वसूल करून दाखवावी, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे आता वाढीव वीज बिलांवरून विरोधक आणि सरकारमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

लॉकडाउनच्या काळात अनेकांना भरमसाठ रकमेची वीज बिले आली होती. नागरिकांच्या मागणीनंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीपर्यंत वाढीव वीज बिलातून सवलत मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र अर्थ विभागाने सरसकट सर्व कंपन्यांच्या ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यास असहमती दर्शवली. त्यांनी दिलेली वीज बिले योग्य होती याची खात्री काय, ते हवी तशी बिले ग्राहकांना देणार आणि आपण त्याचे पैसे भरणार, हे कसे चालेल, असा प्रश्न अर्थ विभागाने उपस्थित केला. अर्थ विभागाच्या या भूमिकेमुळे आता वाढीव वीज बिलात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केल्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Previous articleभाजप सरकारमुळे महावितरणला सर्वात मोठा फटका : ऊर्जामंत्री
Next articleमुंबई महापालिकेवर भेसळयुक्त भगवा कधीच फडकणार नाही; संजय राऊतांचे भाजपला खडेबोल