आगामी काळात मनसेला सोबत घेणार का ? फडणवीस म्हणतात…

मुंबई नगरी टीम

सोलापूर : आगामी निवडणुकीत भाजप मनसेसोबत युती करणार, अशी चर्चा जोर धरू लागली होती. याविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असताना त्यांनी यावर भाष्य केले आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही,अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ज्या दिवशी हे सरकार जाईल,त्यादिवशी आम्ही पर्याय देऊ, असे सांगत त्यांनी आगामी काळात आम्ही मनसेला सोबत घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने शिवसेनेविरोधात दंड थोपटले आहेत. तर दुसरीकडे मनपा निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होणार का? यावरून अनेक तर्कवितर्क काढले जात होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी वृत्ताला दुजोरा न देता मनसेला सोबत घेणार नसल्याचे म्हटले आहे.

यावेळी त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा आम्ही जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. पुणे पदवीधर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील दोनवेळा निवडून आलेत. ही जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास आहे. राज्य सरकारविरोधात पदवीधर आणि शिक्षकांमध्ये रोष आहे, तो मतांमध्ये परावर्तित होईल, असेही ते म्हणाले.दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून संग्राम देशमुख निवडणूक लढत आहेत.तर पुणे शिक्षकमधून शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांना भाजपने पाठिंबा दिला आहे.

Previous articleईडीच्या कारवाईवरून भाजप -सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपले आरोप प्रत्यारोपांचे युद्ध
Next articleमहाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नसल्यानेच ईडीची कारवाई ; शरद पवारांचे टीकास्त्र