काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले ? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

मुंबई नगरी टीम

मुंबई :काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे द्यावे याची चाचपणी काँग्रेसकडून सुरू होती. त्यानुसार नाना पटोले यांच्या हातात प्रदेशाध्यक्षपदाची कमान दिली जाणार अशी माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडने नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे या जबाबदारींचे वाटप व्हावे या अनुषंगाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा अन्य कुणाकडे तरी दिली जाणार आहे. बाळासाहेब थोरात यांनीही जबाबदारी वाटून देण्यास आपली काही हरकत नसल्याचे म्हटले होते. काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह दिल्लीत खलबते झाली होती. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावे समोर आली होती. त्यातील नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. आक्रमक नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. तसेच ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे पटोलेंना ही नवी संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा तरुण नेतृत्वाकडे देण्याची इच्छा बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली होती. भविष्यातील पुढील पिढी घडवण्यासाठी तरुण नेतृत्वाला संधी द्यावी, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असे थोरात म्हणाले होते. तसेच महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष हा लढाऊ बाण्याचा असावा, अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. शिवाय विदर्भात काँग्रेस मजबूत असून इथला अध्यक्ष झाल्यास आनंद होईल, असेही ते म्हणाले विजय वडेट्टीवार देखील प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते.

Previous articleऔटघटकेच्या सरकारचे सूत्रधार कोण ? फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
Next articleअर्णबचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर; गृहमंत्र्यांनी केली ‘ही’ मागणी