औटघटकेच्या सरकारचे सूत्रधार कोण ? फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ

मुंबई नगरी टीम

नागपूर : राज्याच्या राजकारणात भूकंप  घडविणा-या देेेवेंद्र  फडणवीस आणि अजित पवार यांच्या अडीच दिवसाच्या सरकारचे सूत्रधार कोण होते याचा गौप्सस्फोट खुद्द माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑफ रेकॉर्ड’ केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

गेल्या विधानसभा निवडणूकीत सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी आकाराला येवून या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन होणार अशी शक्यता असतानाच,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजभवनावर पहाटे शपथविधी झाल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप घडला होता.या घटनेने राज्यातील राजकारण पुरते ढवळून निघाले होते.अजित पवार यांनी पक्ष फोडला की या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा होता ? अशा अनेक चर्चा झडत होत्या.पहाटेचा शपथविधी कसा झाला ? याचे सूत्रधार कोण होते याचा गौप्सस्फोट या घटनेवर आधारीत असलेल्या तीन पुस्तकात करण्यात आला होता.मात्र याबाबत आपण एक पुस्तक लिहिणार असल्याचे त्यावेळी फडणवीस यांनी सांगून सत्य माहिती याद्वारे उघड करणार असल्याचे स्पष्ट केले होते.राज्यातील ठाकरे सरकारला एका वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर फडणवीस यांनी अडीच दिवसाच्या सरकारचा सूत्रधार कोण याचा उलघडा केला आहे,तोही ‘ऑफ रेकॉर्ड. त्यांच्या या गौप्सस्फोटामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

नागपूरातील एका तरुण उद्योजक,व्यावसायिकांच्या जनरेशन नेक्स्ट ‘एन्टरप्रेनर फोरम’ने काल सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आयोजित केली होती.या कार्यक्रमाला केवळ निवडक निमंत्रितांनाच प्रवेश होता.फडणवीस यांची ही मुलाखत पूर्णत: ‘ऑफ रेकॉर्ड’ कशी होईल याची खबरदारी घेण्यात आली होती.या मुलाखतीची माहिती बाहेर जावू नये,याचे कुठेही प्रसारण होऊ नये किंवा चर्चा होऊ नये,यासाठी आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.कार्यक्रमच्या स्थळी निमंत्रितांना प्रवेश देताना प्रत्येकाचे मोबाईल बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.सव्वा वर्षापूर्वी फडणीस-अजित पवार यांचे अडीच दिवसांचे सरकार स्थापन झाले.हे सरकार स्थापन करताना पडद्यामागे काय-काय घडामोडी घडल्या,हे सरकार स्थापन करणारे सूत्रधार होते,शपथविधीचा व्यूहरचना कशी आखण्यात आल्यापासून ते मंत्रिमंडळाच्या यादीपर्यंत फडणवीस यांनी या मुलाखतीच्या कार्यक्रमात मनमोकळी उत्तरे दिली.

फडणवीस यांच्या या मुलाखतीचे प्रत्यक्षात फेसबुक लाइव्ह सुरू होते. शपथविधीचा घटनाक्रम सांगत असताना फडणवीस आणि मुलाखतीला उपस्थित असणा-या कोणाच्याही हे लक्षात आले नाही.फडणवीस हे उलघडा करीत असताना त्यांनी या शपथविधीचा सूत्रधार कोण याची माहितीही दिली.त्याचवेळी याचे फेसबुक लाइव्ह सुरू असल्याचे लक्षात येताच लाईव्ह बंद करण्यात येवून याची लिंक डिलिट करण्यात आली.तो पर्यंत फडणवीस यांनी शाब्दिक बाणांनी भेद साधला होता.याचा सूचक संदेश व्हायरल झाला त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.या मुलाखतीच्या कार्यक्रमात या अडीच दिवसाच्या सरकारचे सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते,विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांचा दावा काल चांगलाच चर्चेचा विषय ठरला.शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत दिल्यानंतर आम्ही अनेक पर्यायांची चाचपणी करून राष्ट्रवादीशी संवाद सुरू केला. त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली.खातेवाटप, जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित करण्यात आले होते’, असा दावाही फडणवीस यांनी या कार्यक्रमात केला.

Previous articleराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण
Next articleकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले ? लवकरच घोषणा होण्याची शक्यता