मुंबई नगरी टीम
पणजी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कराच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची चौकशी होऊ द्या,मुंडे दोषी आढळल्यास कारवाईची जबाबदारी आमची,असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.तसेच बिनबुडाचे आरोप करणे हा अनेकांचा धंदा आहे, त्यामुळे या गोष्टींवर आपला विश्वास नाही,असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी मुंडे प्रकरणावर भाष्य केले.
धनंजय मुंडे प्रकारची सखोल चौकशी व्हावी.या चौकशी अंती जे निष्पन्न होईल त्यानुसार पक्ष कारवाई करेल, असे शरद पवारांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे मुंडेंचा राजीनामा तूर्तास न घेण्याचा निर्णयही पक्षाकडून घेण्यात आला. मात्र विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र खोटे आरोप करण्याचा अनेकांचा धंदा आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी विरोधकांना सुनावले.निराधार आरोप करून राजीनामा मागायचा. या गोष्टींवर आपला विश्वास नाही. त्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. त्यातील सत्य हे लोकांसमोर आले पाहिजे. धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे. पंरतु सत्य समोर येण्यापूर्वीच कुणावर तरी आरोप करणे त्यांना दोषी ठरवणे योग्य नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.
रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. हे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे सुरुवातीला शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र तक्रारदार महिलेच्या विरोधातच अन्य तिघांनी ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली. त्यामुळे मुंडे प्रकरणाला एक वेगळाच ट्विस्ट आला. त्यामुळे तूर्तास तरी धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाकडून कोणतीही कारवाई होणार नाही. मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही. प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल, असे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्यासोबत धनंजय मुंडेंचे विवाहबाह्य संबंध असल्याचे मुंडेंनी स्वतः कबूल केले होते. पहिल्या बायकोपासून तीन आणि करुणा शर्मापासून दोन मुले असल्याचे मुंडेंनीच सांगितले. परंतु असे असले तरी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंडेंनी ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात येण्याची चर्चा होती. त्या आधारावर तरी मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत.