भाजपची प्रश्नपत्रिका अजून चाचणी परीक्षेतही आली नाही;हिंदुत्वावरून राऊतांचा पलटवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाजपने कोणतेही प्रश्न निर्माण करू नये. त्यांची प्रश्नपत्रिका अजून महाराष्ट्राच्या चाचणी परीक्षेतही आलेली नाही,असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती केल्यानंतर भाजप नेहमीच शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करताना दिसते. त्यामुळे भाजपने कोणतेही प्रश्न निर्माण न करण्याचा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरातुन अभिवादन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात. बाळासाहेबांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली. हिंदुत्वाची लाट निर्माण करण्याचे श्रेय हे बाळासाहेबांचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस ५० वर्षांपूर्वी खचला होता. त्या खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचे बळ दिले. मी मराठी आहे, असे मराठी माणसाला गर्वाने बोलायला त्यांनी शिकवले. त्यामुळे आज सर्व क्षेत्रामध्ये मराठी माणूस झेप घेताना दिसत आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी अनेक घाव झेलले. त्यामुळे मराठी माणूस अनेक शतके त्यांचे स्मरण करेल. बाळासाहेब होते म्हणून आज आम्ही आहोत, असेही राऊत म्हणाले.

भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करू नये

भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयी उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नावरही संजय राऊत यांनी यावेळी उत्तर दिले. भाजपने कोणतेही प्रश्न निर्माण करू नये. त्यांची प्रश्नपत्रिका अजून महाराष्ट्राच्या चाचणी परीक्षेतही आलेली नाही, असा पलटवार संजय राऊत यांनी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात भाजपच्या निर्माण झालेल्या अस्तित्वाविषयी देखील भाष्य केले. आज महाराष्ट्रात जो भारतीय जनता पक्ष आहे, त्यांची जी ताकद आहे. त्याचे श्रेय हे बाळासाहेबांना जाते. त्यावेळी जर शिवसेनेने युती केली नसती. तर आज ग्रामीण भागात भाजप दिसला नसता. महाराष्ट्रात भाजप नव्हती. त्यामुळे शिवसेनेमुळे महाराष्ट्रातील गावागावात भाजपचाही प्रचार आणि प्रसार झाला. आमच्यासाठी ही बाब अभिमानास्पद होती. कारण सर्वजण ‘गर्व से काहो हम हिंदू है’ या घोषणेच्या स्वबळावर एकत्र आले होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Previous articleबाळासाहेंबाच्या विचारात तुम्ही मिसळ केली असेल आम्ही नाही !
Next articleजयंत पाटील सलग १८ दिवस दौऱ्यावर;१४ जिल्हे,८२ मतदारसंघात संवाद साधणार