बाळासाहेंबाच्या विचारात तुम्ही मिसळ केली असेल आम्ही नाही !

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आज जयंतीनिमित्त राज्य आणि देशपातळीवरील प्रमुख नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात सोडलेली आपली छाप ही प्रत्येक राजकीय नेत्यासाठी एक आदर्शच म्हणावा लागेल. बाळासाहेंबांचे कट्टर हिंदुत्व आणि त्यासाठी लढण्याची त्यांची जिद्द याविषयी सोशल मीडियावर सध्या अनेकजण भाष्य करताना दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलेल्या त्या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शिवसेनेला एकप्रकारे अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारा एक व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे. “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!”, अशा मथळ्याखाली त्यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओमध्ये आपल्या तसेच बाळासाहेबांच्या काही निवडक भाषणांचा संदर्भ दिला आहे. “अलीकडच्या राजकारणात आपण बघतो खुप वेळा नेत्यांची मने छोटी छोटी होतात. ते आपल्या पलीकडे पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेंबांचे मन देखील राजासारखे होते”, अशा फडणवीसांच्या एका भाषणातील वाक्याने या व्हिडीओची सुरुवात करण्यात आली आहे. तर स्वाभिमान, गद्दारी, सत्तेसाठीची लाचारी, अशा बाळासाहेबांनी केलेल्या भाषणातील विधानेच या व्हिडीओत प्रामुख्याने घेण्यात आली आहेत.

“बाळासाहेब ठाकरेंचे नाव जिथे येईल त्या ठिकाणी संघर्षाला उभे राहू.त्यांच्या बाजूने त्यांच्या विचारांकरिता उभे राहू. तुम्ही त्यांच्या विचारांत मिसळ केली असेल आम्ही नाही”, फडणवीसांच्या या भाषणाची जोडही व्हिडीओत पाहायला मिळते.एकंदर देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा व्हिडीओ ट्वीट केला असला तरी, त्यानातून शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली, अशी टीका भाजपडकून वारंवर केली जाते. तसेच ही आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. शिवसेनेच्या भगव्यात भेसळ झाली आहे, असे टीकास्त्रही भाजपने डागले. त्यामुळे शिवसेनेने आपल्याशी काडीमोड घेत सत्तेपासून दूर ठेवल्याची नाराजी भाजपमध्ये अजूनही असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्ता गमावल्याचे आणि शिवसेनेने घेतलेली फारकत याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी नाराजी दर्शवणारे उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Previous articleअर्णबला एअरस्ट्राईकची माहिती आधीच कशी ? केंद्राने उत्तर द्यावे; गृहमंत्र्यांची मागणी
Next articleभाजपची प्रश्नपत्रिका अजून चाचणी परीक्षेतही आली नाही;हिंदुत्वावरून राऊतांचा पलटवार