मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ कारवाईचा इशारा दिला. मात्र गृहमंत्र्यांनी कारवाई विषयी ट्वीट करताना उल्लेख केलेला आक्षेपार्ह मजकूरच वापरला त्यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्र्यांवर टीका केली आहे. तुम्हाला महिला सन्मानाबद्दल इतका कळवळा असता तर हा मजकूर तुम्ही ट्विटमध्ये वापरला नसता, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा अपमानजनक उल्लेख पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आला होता. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत हा प्रकार पाहून आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले होते. गृहमंत्र्यांच्या याच ट्वीटला चंद्रकांत पाटील यांनी रिप्लाय दिला आहे.
“याच्यामागे कोण आहे हे भाजप नक्कीच शोधून काढले व कारवाई करेल. मात्र गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता”, असे चंद्रकांत पाटील यांनी सुनावले. दरम्यान, रक्षा खडसे यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला असून अशा गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होता काम नये, असे त्या म्हणाल्या. तसेच हा प्रकार भाजकडून घडलेला नसून याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.