मुंबई नगरी टीम
पुणे : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अखेर गुरुवारी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. मात्र पटोले यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. यावर आज स्वतः अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर आपण नाराज नसल्याचे ते म्हणाले. परंतु नाना पटोले यांनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता तर बरे झाले असते, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. अखेर काल सायंकाळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सुरु उमटल्याची चर्चा होती. त्याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, नाराज असण्याचे काही कारण नाही. कुणाकडे कुठली पदे द्यायची हे सर्वांनी मिळून ठरवले होते. तसे राष्ट्रवादी, काँग्रेसने शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि तेही उद्धव ठाकरेच असतील, अशी भूमिका घेतली होती. ती भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले. चर्चा करतात. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी माझ्याशी आणि राज्याच्या प्रमुखांशीही चर्चा केली. आताही पद रिक्त झाल्यानंतर चर्चा होणार. आघाडीमध्ये चर्चेने मार्ग काढले जातात, असे अजित पवार म्हणाले.
काँग्रेसला जी काही पदे मिळाली आहेत. त्याबाबत त्यांनी काय करावे हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर राजीनामा दिला असता तर बरे झाले असते मला आणि मुख्यमंत्र्यांना वाटत होते. पण, काँग्रेसच्या हायकमांडने निर्णय घेतला. त्यानंतर नाना पटोलेंनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला, असे अजित पवार म्हणाले. तसेच पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नव्हता. यावर बरेच दिवस चर्चा चालली होती. काँग्रेस नेत्यांना हायकमांडने दिल्लीत बोलवून तिथेही चर्चा झाली होती, असे अजित पवारांनी सांगितले.
नितेश राणेंना टोला
भाजप नेते नितेश राणे हे ट्विटरवरून वारंवार अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. त्यावर बोलताना अजित पवार यांनी कावळ्याच्या शापाने गुरे मरत नसतात. त्यांचे नाव घेऊन अधिक महत्त्व कशाला द्यायचे, असे म्हणत अजित पवारांनी राणेंना टोला लगावला.