अन् धनंजय मुंडेंनी ‘त्या’ कार्यकर्त्याचा पूर्ण केला पण !

मुंबई नगरी टीम

बीड : गहिनीनाथ गड येथील महापूजेनंतर धनंजय मुंडे यांनी आष्टी तालुक्यातील सांगवी, पाटण, खिळद आदी गावांना भेटी दिल्या, यावेळी गावोगावी स्थानिकांनी मोठ्या उत्साहात, वाजतगाजत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत केले.

धनंजय मुंडे परळीतून निवडून येतील व त्यानंतर माझ्या गावात येऊन माझा सत्कार स्वीकारतील तेव्हाच मी डोक्यावरचे केस कापीन,असा पण आष्टी तालुक्यातील लिंबोडी गावच्या गणेश खाडे नामक युवकाने केला होता! अखेर आज धनंजय मुंडे यांनी लिंबोडी ता. आष्टी येथे जाऊन गणेश सह गावकऱ्यांचे स्वागत-सत्कार स्वीकारून आपल्या या कार्यकर्त्याचा पण पूर्ण केला! यावेळी गावकऱ्यांनी जेसीबीने फुले उधळत, वाजत गाजत मुंडेंचे स्वागत केले.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे व जिल्हावासीयांचे प्रेम हीच आपली शक्ती असून ही शक्ती कोणत्याही संकटाशी लढण्याचे बळ देते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मुंडे यांच्यासह आ. बाळासाहेब आजबे,बजरंगबप्पा सोनवणे, मा.आ. साहेबराव दरेकर, सतिश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, आप्पासाहेब राख, विठ्ठल सानप यांसह आदी उपस्थित होते.गहिनीनाथ गडावरील पुण्यतिथी सोहळा आटोपून बीड कडे निघालेल्या मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान हनुमान गड येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी गडाचे महंत ह.भ.प. बुवा महाराज खाडे व उपस्थित नागरिकांनी मोठ्या जल्लोषात धनंजय मुंडे यांचे अभूतपूर्व स्वागत केले.

Previous articleअखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ नाना पटोलेंच्या गळ्यात, कार्यकारी अध्यक्षही जाहीर
Next articleअजित पवार म्हणाले…..नाना पटोलेंनी राजीनामा ‘या’ वेळी द्यायला हवा होता