मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने राज्यात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करण्याची तयारी केली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८:३० वाजता समाज माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याने या संवादात ते राज्यात लॉकडाऊनची घोषणा करणार का ? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने राज्यात लॉकडाऊन करण्याच्या हालचाली राज्य सरकारने गेल्या दोन दिवसांपासून सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थानी एकामागून एक बैठका घेत आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले होते.त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांशीही संवाद साधला होता.राज्यातील व्यापारी,व्यावसायिक आणि विविध घटकांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी सर्वांची मते जाणून घेतली होती.त्यानुसार राज्यातील कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय डोळ्यासमोर ठेवून,त्यांच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.त्यातच आज मुख्यमंत्री ठाकरे हे ८:३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याने मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात लॉकडाऊन नेमका केव्हा लागू केला जातो याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील वीकेंड लॉकडाऊनला जनतेने दिलेला प्रतिसाद,राज्यातील लसीकरण, रक्तदान,सरकारी आणि खासगी कार्यलयांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु करणे याबाबत या संवादात मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याबाबत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचे मत तज्ञांनी मांडले असल्यामुळे मुख्यमंत्री आज काय बोलणार ? कोणती घोषणा करणार हातावर पोट असणा-यांसाठी काय मदत जाहीर करणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.