धान्य,शिवभोजन थाळी मोफत मिळणार,फेरीवाला,रिक्षाचालकांना पंधराशे रुपये मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्यापासून १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करतानाच राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना गोरगरिबांना मोठा दिलासा दिला आहे.या काळात सर्वसामान्यांना त्रास होवू नये म्हणून दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेजची घोषणा केली आहे.प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य तर ५ रूपयांना मिळणारी शिवभोजन थाळी आता मोफत मिळणार आहे.पाच लाख फेरीवाल्यांसह,बारा लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना सरकार गरजूंच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.राज्यात उद्या बुधवार १४ एप्रिल पासून रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील असे त्यांनी सांगितले.राज्यात मार्च २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.कोरोना संकटाचा मुकाबला करताना सरकार गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे,महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार,रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे.तसेच राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल.याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.सर्वसामान्य जनतेला दिलासा देत,राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.तसेत हातावर पोट असणा-याराज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही त्यांनी केली.आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येणार आहे.याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येणार आहे.याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

मी हे निर्बंध आनंदाने लादत नाही आज परिस्थिती इतकी वाईट आहे की आपले प्राण वाचविणे यालाच आपले पहिले प्राधान्य आहे. मला टीकाकारांची पर्वा नाही कारण आपल्याशी असलेल्या बांधिलकीला जागून मी पाउले टाकतोय आणि म्हणूनच सर्वांनी एकमुखाने व एकत्र येऊन कोविडला परतविण्यासाठी सहकार्य करावे असे भावनिक व कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.१ मे पर्यंत राज्यात संचारबंदी असून १४४ कलम लागू करण्यात आले आहे. केवळ आवश्यक सेवा सुविधाच सुरु राहतील. सर्व प्रकारची वाहतूकही सुरूच राहणार आहे तसेच आर्थिक दुर्बल घटकांना देखील त्यांना त्रास होणार नाही यासाठी चांगले आर्थिक सहाय्य देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.मुख्यमंत्री यावेळी विशेषत: ऑक्सिजन उपलब्धतेवर बोलले. ते म्हणाले की,राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. सध्या १२०० मेट्रिक टन उत्पादन सुरु आहे. आणि आपण कोविड आणि नॉन कोविड अशा सर्वांसाठी मिळून जवळजवळ तितकाच ऑक्सिजन वापरत आहोत. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी राखीव ठेवायचे ठरविले आहे . केंद्राकडून आपल्याला इतर काही राज्यांतून ऑक्सिजन उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे मात्र ही ठिकाणे खूप दूरवरची असल्याने तो ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे, हवाई मार्गाने किंवा रस्ते मार्गे वाहनाने आणण्यासंदर्भात केंद्राला मदत करण्याची विनंती केली आहे . विशेषत: हवाई दलाच्या मदतीने हवाई मार्गे ऑक्सिजन आणता आला तर लवकर उपलब्धता होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी पंतप्रधानांना आपण पत्र लिहीत असल्याचेही ते म्हणाले.

देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमडीसीव्हीरचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संसर्ग कमी झाल्याने मधल्या काळात उत्पादन कमी झाले होते मात्र आता ते पूर्ववत होत असल्याची माहिती कंपन्यांनी दिली आहे असेही ते म्हणाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पंतप्रधानांकडे महत्वाच्या मागण्या केल्या आहेत असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मार्च महिन्यामध्ये जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर परतावा दाखल करण्याची मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखी तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकेल असे ते म्हणाले. देशातील सर्व पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानांनी कोविड परिस्थितीत राजकारण न करण्याबाबत समज द्यावी असेही आपण सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.आज  राज्यात ६० हजार २१२ इतके उच्चांकी रुग्ण आढळले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की १२ एप्रिल पर्यंत राज्यात ३४ लाख ५८ हजार २४५ इतके रुग्ण होते. त्यापैकी ५ लाख ६५ हजार सक्रीय आहेत.आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर वाढून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन ४० दिवस इतका झाला आहे असे संगून मुख्यमंत्री म्हणाले की सुविधा कमी पडताहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात उद्या बुधवार १४ एप्रिल पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
लोकल, बससेवा सुरू राहणार

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहणार असून,सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल,बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पावसाळ्याची कामे पावसाळ्यापूर्वच करावी लागतात.ती कामे चालू राहणार आहेत. बँका आणि दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहणार आहेत.यामध्ये पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे.कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असणार आहे.हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त होम डिलीव्हरी सुरू असेल,हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.

Previous articleमुख्यमंत्री आज ८:३० वाजता जनतेशी संवाद साधणार,लॉकडाऊनची घोषणा करणार ?
Next articleवाचा लॉकडाऊनची नियमावली: काय बंद काय सुरू,कोणती दुकाने,सेवा सुरू असणार