मुंबई नगरी टीम
बारामती: राज्यातील ठाकरे सरकार केव्हा पडणार यांचे अनेक मुहूर्त विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी वर्तवले आहे.आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार झोपेत असतानाच पडेल,असा नवा मुहूर्त शोधला असतानाच पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडतानाच पवार यांनी राज्यातील ठाकरे सरकार किती वर्षे टिकेल यांचेही भाकित केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येवून दीड वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ठाकरे सरकार केव्हा पडणार याची भविष्यवाणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी अनेकदा केली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,खासदार नारायण राणे यांच्या नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता ठाकरे सरकार केव्हा पडणार यांचा अंदाज वर्तवला आहे.ठाकरे सरकारला १८ महिने बोनसमध्ये मिळाले असून,आता लोकं झोपत असताना कधीही हे सरकार पडेल,असा दावा पाटील यांनी केला होता.ठाकरे सरकार कोणत्याही क्षणी पडेल,यासाठी बॅग भरुन तयार असतानाही सरकारला १८ महिने मिळाले आहे.यामध्ये कोरेनाचा एक भाग आहे, तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की,दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले,केसाने गळा कापणे म्हणतात तसे,तसेच आताही झोपेत असताना ठाकरे सरकार जाईल,असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत केले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौ-यावर होते.त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.ज्या दिवसापासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आले आहे,तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालेले आहे, त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असते. कार्यकर्त्यांनी सोबत रहावे यासाठी त्यांचे नेते काही ना काही बोलत राहतात.जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत,तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार राहणार,असा दावा पवार यांनी करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा दावा खोडून काढीत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचे सांगितले.