मुंबई नगरी टीम
अमरावती । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष टीकेल तसेच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रित लढू असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला असतानाच त्याच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार पुढील पाच वर्ष टीकेल असे सांगतानाच,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची भूमिका मांडली होती.मात्र पवार यांच्या या वक्तव्यांनतर काँग्रेसने पुन्हा एकदा आपली भूमिका जाहीर केली आहे.काँग्रेस पक्ष सर्व निवडणुका या स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे.त्यामुळे राज्यातील आगामी सर्वच निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर काँग्रेसच्या या निर्णयाचा फायदा भाजपला होवू शकतो असे जाणकारांचे मत आहे.राज्यातील महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा तिन्ही पक्षांकडून केला जात असला,तरी तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केले जाणा-या वेगळ्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत असणारी धुसपूस समोर येते.आम्ही आधीच आमची निवडणुकांबद्दलची भूमिका जाहीर केली आहे.आज आम्ही सोबत आहोत असे म्हटले आणि ऐनवेळी स्वतंत्र लढणार अशी भूमिका घेतली तर,ते पाठित खंजीर खुपसल्यासारखे होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही आम्ही स्वतंत्रच लढणार म्हणत आहोत,असे पटोले म्हणाले. आम्ही आमची तयारी सुरू केली आहे त्यामुळे मित्रपक्षांनी देखील तयारी सुरू करावी असे पटोले म्हणाले.त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस सत्तेतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०२४ साली राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग हा फक्त मोझरी परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करू. महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल, असा मानस पटोले यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भ दौऱ्यावर असून आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, विदर्भाच्या दौऱ्यात आपण कष्टकरी, कामकरी, शेतकरी, गरिबांच्या व्यथा पाहिल्या आहेत. कोरोनामुळे या लोकांचे जगणे अवघड झाले आहे. एकीकडे कोरोनाशी सामना तर दुसरीकडे जगण्याची धडपड सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारने लोकांना जाणीवपूर्वक मरणाच्या दारात आणून ठेवले आहे. ऑक्सीजन, रेमडेसीवर या औषधांचा पुरवठा केंद्र सरकार करते तो वेळेवर व पुरेसा न केल्यामुळे हजारो लोकांचे जीव गेले. आताही बुरशी आजारावरचे इंजेक्शन केंद्राकडून वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शेतकरी सहा महिन्यापासून आंदोलन करत आहेत पण पंतप्रधान मोदींना या शेतकऱ्यांशी बोलावयास वेळ नाही. भाजपचे सरकार देशाला अधोगतीकडे घेऊन गेले आहे. काँग्रेसचा विचारच या देशाला वाचवू शकतो, संविधानाला वाचवू शकतो असेही ते म्हणाले.