मुंबई नगरी टीम
मुंबई । ३० वर्षे एकत्र राहून काहीच झाले नाही तर आता काय होणार ? असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपशी हातमिळवणीची शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली.एका बाजूला कॅांग्रेस तर दुस-या बाजूला राष्ट्रवादी असल्याने आम्ही बाहेरच पडू शकणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यापासून राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.त्याच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत “आमच्यात शत्रुत्व कधीच नव्हतं. आमच्या वैचारिक मतभेद निर्माण झाले.कारण आमचा हात सोडून आमचे मित्र ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळे मतभेद उभे झाले. हा धुऱ्याचा वाद नाही.आमच्यात कुठलेही शत्रूत्व नाही,” असे फडणवीस यांनी वक्तव्य केल्याने उलटसुलट चर्चा होत्या.त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात युतीचे सरकार येणार अशा चर्चांना उधाण आले होते.मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या सर्व शक्यता फेटाळून लावल्या.गेल्या ३० वर्ष एकत्र राहून काही झाले नाही तर आता काय होणार असे सांगून त्यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली.आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या डाव्या बाजूला उपुमख्यमंत्री अजित पवार तर उजव्या बाजूला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे बसले होते. त्याचा संदर्भ देत,आम्ही बाहेर कसे पडणार,एका बाजूला थोरात तर एका बाजूला पवार बसले आहेत.त्यामुळे आम्ही बाहेर पडू शकणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कालचा गोंधळ पाहून या सभागृहात जेष्ठ असणारे बाळासाहेब थोरातही अवाक झाले.त्यांना हा पहिलाच अनुभव आला आहे आणि माझ्या पहिल्याच टर्म मध्ये पहिला अनुभव आला असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगून,कालची लाजीरवानी घटना राज्यातील जनतेने पाहिली आहे.कालची घटना मान शरमेने खाली जाईल अशी होती,एका जबाबदार पक्षाने हे केल्याचे वाईट वाटते, आरडाओरडा म्हणजे लोकशाही नव्हे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.