या बाराशी ‘त्या’ बाराचा काही संबंध नाही ! अजितदादांच्या उत्तराने एकच हंशा

मुंबई नगरी टीम

मुंबई । पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले.तर महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे पाठवलेल्या १२ जणांच्या यादीला अजून मंजूरी मिळाली नसल्याने “या बाराशी ‘त्या’ बाराचा काही संबंध नाही” असे मिश्किल उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिल्याने एकच हंशा पिकला.

महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ जणांच्या नावाची यादी राज्यपाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सूपूर्द करून काही महिने उलटले तरी अजून या यादीला मंजूरी मिळाली नाही.त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे.त्यातच काल विधानसभेत झालेला अभूतपूर्व गोंधळ आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी भाजपच्या आमदारांनी केलेल्या शिवीगाळ आणि गैरवर्तनामुळे १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.योगायोगाने या दोन्ही सदस्यांची संख्या १२ असल्याने याचे अनेक तर्क लढवले जात आहेत.त्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री पवार यांना प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, कावळा बसायला आणि फांदी तुटायला….या बाराशी त्या बाराशी कसलाही संबंध नाही, भाजपने जाणूनबुजून केलेले हे कृत्य आहे. त्यांच्याकडून गैरवर्तन झालेले आहे.भास्कर जाधव हे तापट स्वभावाचे आहेत हे आपल्याला माहितच आहे पण काल त्यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली.जाधव हे शिवसैनिक असतानाही त्यांनी फिजिकली काही केले नाही, या अजित पवारांच्या उत्तरामुळे एकच हंशा पिकला.

Previous articleमराठा उमेदवारांना दिलासा:’या’ उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
Next article३० वर्षे एकत्र राहून काहीच झाले नाही तर आता काय होणार ? मुख्यमंत्र्यांनी युतीची शक्यता फेटाळली