पोलीस दलाच्या आधुनिकिकरणास “देणगी ” स्विकारण्यास मान्यता
मुंबई पोलीस फाऊन्डेशन न्यास स्थापन करण्यास मान्यता
मुंबई दि.23 मुंबई शहरातील खाजगी संस्था तसेच उद्योग समुहाकडून पोलीस दलाच्या आधुनिकिकरण आणि कल्याणासाठी देणगी स्विकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या साठी” मुंबई पोलीस फाऊन्डेशन न्यास ” स्थापन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
बृहन्मुंबई पोलीस दलाच्या आधुनिकिकरणासाठी मुंबईतील अनेक खाजगी संस्था व उद्योग समूह देणगी देण्यास तयार असतात परंतु पोलीस दलास देणगी स्विकारण्याची परवानगी नसल्याने पोलीसांच्या कल्याणासाठी आणि आधुनिकिकरणामध्ये मोठी अडचण निर्माण होत होती. जगातील इतर देशातील महानगर पोलीस दला प्रमाणे मुंबई पोलीसांना ” मुंबई पोलीस फाऊन्डेशन ” नोंदणीकृत न्यास स्थापन करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती पोलीस आयुक्त यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार मुंबई पोलीसांना न्यास स्थापन्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
हे न्यासाची नोंदणी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे करण्यात येणार असून, या न्यासाच्या माध्यमातुन खाजगी संस्था आणि उद्योग संस्थांकडून स्वेच्छापूर्वक देणगी स्विकारली जाणार आहे. देणगी गोळा करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने काही अटीही घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार विश्र्वसनीय व्यक्तींकडूनच अशी देणगी स्विकारली येणार आहे शिवाय पोलीस दलातील कोणत्याही अधिका-याला वैयक्तिक देणगी स्विकारता येणार नाही.