काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर संधी मिळणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेतील रिक्त झालेल्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची आज घोषणा केली आहे.त्यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या ४ ऑक्टोबर निवडणूक होणार आहे.राज्यातील एका जागेसाठी काँग्रेसकडून राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह,पश्चिम बंगाल,आसाम,मध्यप्रदेश आणि तामीळनाडूमधून राज्यसभेवर रिक्त झालेल्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .यामध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त असलेल्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख आहे.काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे १६ मे पासून महाराष्ट्रातून राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे.काँग्रेसने राज्यातून तरूण नेते राजीव सातव यांना राज्यसभेवर संधी दिली होती. १६ मे रोजी राजीव सातव यांचे कोरोनामुळे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्यातील राज्यसभेची जागा रिक्त झाली होती.राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागी त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध असलेल्या राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना नुकत्याच जाहीर झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणी स्थान देण्यात येवून त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राजीव सातव यांच्या निधनानंतर डॉ. प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.त्यांनी दिल्लीत जावून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.त्यामुळे राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेस डॉ. प्रज्ञा सातव यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम असा आहे

राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी ४ ऑक्टोबर ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.या निवडणुकांसाठी १५ सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार असून,२२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख असून २३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार.२७ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

Previous articleठाकरे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय
Next articleतर जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका महाविकास आघाडीकडे : अजितदादांचे भाकित