मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य शासनाने अखेर तीन राज्य माहिती आयुक्त नियुक्त केले. गुरुवारी त्याबाबतची अधिसूचना जारी केली. सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय आणि राहुल भालचद्र पांडे अशी नव्याने नियुक्त केलेल्या माहिती आयुक्तांची नावे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना केल्या होत्या,या नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शोध समितीच्या माध्यमातून उमेदवार निवडीची प्रक्रिया सार्वजनिक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शोध समिती स्थापन केली होती.लोकशाहीतील अधिकार व कर्तव्ये याबाबत स्पष्ट विचार असलेल्या अनुभवी व्यक्तींची विभागीय माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्याचे अधिकार राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला आहेत. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडेच आहे.राज्यात मुख्य माहिती आयुक्तांसह पुणे, मुंबई, बृहन्मुंबई, कोकण, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती अशी आठ माहिती आयुक्तांची कार्यालये आहेत. यापैकी या पैकी तीन माहिती आयुक्तांकडे तीन खंडपीठाचा अतिरिक्त कार्यभार होता. २०१८ मध्ये माहिती आयुक्तांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने माहिती आयुक्तांची पदे भरली नव्हती. परिणामी प्रलंबित अपिलांची संख्या २० पर्यंत गेली होती. त्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.