मावळमध्ये निष्पाप शेतक-यांवर गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवली नाही ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । मावळमध्ये निष्पाप शेतक-यांवर गोळीबार होतो,राजस्थानमध्ये शेतक-यांना लाठ्या-काठ्यांनी तुडविले जाते,तेव्हा यांना जालियनवाला बाग आठवत नाही,अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरप्रदेशातील लखीमपूर घटनेची तुलना करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला.

उत्तरप्रदेशातील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीचा समाचार घेतला.महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे.या नेत्यांना शेतक-याप्रति खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करावी,अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच.सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यात लक्ष घातले आहे आणि तेथील सरकार कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. मात्र, आज महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत.राज्यात २ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.त्यांना ना कर्जमाफीचा लाभ,ना कोणती मदत.अशात त्यांना मदत देणे सोडून सरकारपुरस्कृत दहशतवाद या नेत्यांनी हाती घेतला आहे.निष्पाप लोकांना मारहाण केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने जनतेला बंद करण्यासाठी बाध्य केले जात आहे.संपूर्ण सरकारी व्यवस्थेचा हा मोठा गैरवापर आहे.मावळमध्ये निष्पाप शेतक-यांवर गोळीबार होतो,राजस्थानमध्ये शेतक-यांना लाठ्या-काठ्यांनी तुडविले जाते,तेव्हा यांना जालियनवाला बाग आठवत नाही,अशा सब्दात नाव न घेता त्यांनी पवार यांना टोला लगावला.

या सरकारने सा-या योजना बंद केल्या, अनेक योजनांना स्थगिती दिली. गेले दीड वर्षे बंदच पाळला. पण, आताकुठे थोडे उघडले, तर पुन्हा बंद. हे अख्खं सरकारच ‘बंद सरकार’ आहे. आमचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करतात,तर त्यांचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आले.आता सरकारपुरस्कृत हिंसा केली जात असताना पोलिसही बघ्याची भूमिका घेतात. तमाशा पाहतात. या तोडफोडीची, मालमत्ता नुकसानीची वसुली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली पाहिजे. मंत्रिमंडळ बैठकीत बंदचे निर्णय होतात, असे महाराष्ट्रात प्रथमच होते आहे. या सरकारमध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल आणि यांना खरोखर शेतक-यांप्रति कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक-यांसाठी मदत जाहीर झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

Previous articleएकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे मला आठवलेय “महायुतीचे” गाणे
Next articleउत्तरप्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट : नाना पटोलेंचे टीकास्त्र