एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे मला आठवलेय “महायुतीचे” गाणे

मुंबई नगरी टीम

मुंबई । चिपी विमानतळ उदघाटन सोहळ्यात एकमेकांवर टोलेबाजी करण्याचे काम देखील जोमाने सुरु असल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच मंचावर उपस्थित असल्याने या सोहळ्याकडे आज सर्वांचेच लक्ष लागलेले पाहायला मिळाले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भाषणाने आणि कवितांनी सर्वांचेच लक्ष वेधले.

“सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान, कारण चिपीमध्ये आलं आहे मुंबईवरून विमान”, अशा ओळी म्हणतच आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. जर आपण टुरिझम वाढवलं, तर दिल्ली,बंगलोर, कोलकाता या अनेक ठिकाणांवरून येथे येईल विमान असेही ते म्हणाले. राजकारण बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत. सिंधुदुर्गला सुंदर असा निसर्ग आहे, डोंगर, नद्या आहेत, येथील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे असे मत रामदास आठवलेंनी व्यक्त केले.

याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवलेय महायुतीचे गाणे. अशी चारोळी म्हटल्यावर एकाच हशा झाला. तसेच ते पुढे म्हणाले कि या विमानतळासाठी सर्वांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले, नारायण राणेंनी केले,सुभाष देसाईंनी केके आणि मीही यासाठी प्रयत्न केले हे वाक्य म्हणताच पुन्हा हशा पेटला. शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेव्हा मीदेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना रामदास आठवले यांनी उजाळा दिला. चिपी विमानतळासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.उड्डाण-प्रादेशिक संपर्कता योजनेंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,तसेच अन्य मंत्री उपस्थित होते.

Previous articleनवाब मलिक कोणाला वाचवत आहेत ? प्रविण दरेकर यांचा सवाल
Next articleमावळमध्ये निष्पाप शेतक-यांवर गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवली नाही ?