दोन वर्षानंतर सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मिळणार ! मुख्यमंत्री घेणार निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लागू केलेल्या निर्बंधामुळे (corona restriction) गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयात सर्वसामान्य जनतेला प्रवेश देण्यात येत नाही.गुढीपाढव्यापासून राज्य सरकारने राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले असले तरी राज्यातील सर्वसामान्य जनतेला मात्र अजून मंत्रालयात (mantralay) प्रवेशासाठी परवानगी दिली जात नसल्याने राज्याच्या कानाकोप-यातून आपल्या समस्या घेवून येणा-या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर जनताजनार्दनासाठी बंद असलेले मंत्रालयाचे प्रवेशव्दार येत्या सोमवारपासून उघडले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले होते.सरकारी कार्यालयामध्येही ५० टक्के कर्मचा-यांची उपस्थितीचा निर्णय घेवून कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी सरकारी कार्यालयात अभ्यांगतांना प्रवेश देणे बंद करण्यात आला होता.मात्र कोरोना संख्या अटोक्यात आल्यावर बहुसंख्य कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालयाची दारे बंद आहेत.गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेवून राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयातून कामकाजास सुरूवात केली असली तरी सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालयाची दारे खुली झाली नसल्याने राज्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. निर्बंधाच्या काळात सर्वसामान्य जनतेची गैरसोय होवू नये म्हणून निवेदने स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वराजवळ निवेदने स्वाकारण्यासाठी खिडकीची व्यवस्था करण्यात आली असली तरी आपले गा-हाणे मांडण्यासाठी मंत्री महोदयांची भेट होत नसल्याने जनतेचा हिरमोड होत होता.

गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी मंत्रालयाची दारे बंद असली तरी उद्योगक,व्यावसायिक आणि मध्यस्थांना मंत्र्यांच्या तसेच त्यांच्या सचिवांच्या शिफारशीने मंत्रालयात प्रवेश दिला जात आहे.कोरोनाच्या काळात मुख्यमंत्रीही मंत्रालयात फिरकत नसल्याने बहुसंख्य मंत्री आपला कारभार बंगल्यावरून हाकत होते.आजही काही मोजके मंत्री मंत्रालयात हजेरी लावताना दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्य जनतेला पूर्वीप्रमाणे दुपारी दोन नंतर मंत्रालयात प्रवेश देण्यासाठी गृहविभागाने प्रस्ताव तयार केला असल्याचे समजते.हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेतल्यानंतर येत्या सोमवारपासून सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात पूर्वीप्रमाणे प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे.

Previous article६ आमदारांच्या नियुक्तीच्या ” त्या ” बनावट पत्रामुळे खळबळ ; चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
Next articleघोटाळे बाहेर येत असल्यानेच विरोधकांचा पोलखोल रथावर भ्याड हल्ला