मुंबई नगरी टीम
मुंबई । क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओमुळे एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. प्रभाकर साईल या प्रकरणात २५ कोटीची लाच मागितल्याचा आरोप केल्यानंतर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत.या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यास कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर त्यांनी मुंबई पोलीसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली.त्यानुसार त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.तसेच या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.गृहमंत्री पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.मात्र या भेटीत या प्रकरणावर कसलीही चर्चा झाली नसल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र पाहिले आहे. त्यांनुसार त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे, असेही माहिती वळसे-पाटील म्हणाले.या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेवून कारवाईची मागणी करणार असल्याचे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी वक्तव्य केले आहे.त्याबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले की,मलिक हे प्रचार दौ-यावर आहेत.त्यांची भेट झाल्यावर त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढील कारवाई करू असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान केंद्रीय यंत्रणांचा वापर यापूर्वी एवढा झाला नव्हता.राजकीय व्यक्ती आणि सरकारला वेठीस धरण्याचे काम सुरू आहे अशी टीका करतानाच,कारवाई करण्यासाठी कोणी तक्रार दाखल केल्यास कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.