मुंबई नगरी टीम
मुंबई । एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि एनसीबीवर जाणीवपूर्वक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय.मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री त्याचप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सर्व विधानांमधून फक्त एनसीबीला टार्गेट करुन एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार सुरु असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
क्रुज ड्रग प्रकरणातील पंच किरण गोसावी यांचा ड्रायव्हर प्रभाकर साईल यांनी आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटीची डील झाल्याचा आरोप केला आहे. या विषयावर बोलताना दरेकर म्हणाले की, एनसीबी कशी चुकीची आहे, समीर वानखेडे कसे चुकीचे आहे ? असे बिंबवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. कोणताही पक्ष एखाद्या तपास यंत्रणेचा मालक नसतो. महाराष्ट्रातील पोलिसांचे वेगवेगळे सेल आहेत, मग त्यांचे मालक महाविकास आघाडी सरकार आहे का? असा सवालही प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
दरेकर म्हणाले की, प्रभाकर साईल यांनी जो आरोप केला आहे तो आरोप आणि सत्यता यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुमच्याकडे असलेले सगळे आरोप, सगळे पुरावे कोर्टात सादर करा. कोर्ट त्याची सत्यता पडताळेल आणि मग यांचे आरोप खरे की खोटे आहेत, यासंदर्भात भूमिका घेऊ शकेल, अशी सूचनाही दरेकर यांनी यावेळी केली.एनसीबीच्या बाजूने आम्ही एवढ्यासाठी बोलतोय की, आज अंमली पदार्थांचा विळखा तरुण पिढीला बसतोय आणि युवा पिढीला बरबाद करतोय, म्हणून त्याच्या विरोधात जी कारवाई होत आहे, यासाठी एनसीबीचे कौतुक केले पाहिजे. आम्हाला कोणाला पाठीशी घालण्याचे कारण नाही. ड्रगचा विळखा जो युवा पिढीला बसतोय त्याला आळा बसण्यासाठी एनसीबी योग्य दिशेने कारवाई करत आहेत. राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी जर अशा प्रकारच्या कारवाया केल्या तर त्यालाही आमचे समर्थन असेल असे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की,येथे राजकीय पक्ष आला कुठे ? संजय राऊत हे सत्ताधारी पक्षातील नेते आहेत. त्यांना कोणाविरुध्द कारवाई करावयाची असेल तर ते करु शकतात. त्यांना अडवले कोणी? त्यांना एसआयटी स्थापन करायची तर ते करू शकतात, पण ज्या जबाबदार तपास यंत्रणा आहेत त्यांना विनाकारण जनतेमध्ये बदनाम करू नका अशी भूमिका दरेकर यांनी मांडली.