कर्जमाफीचा “वायदे बाजार”
सामनातुन सरकारवर टिका
मुंबई दि. २८ कर्जमाफीच्या गोंधळावरून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. कर्जमाफी हा लाखो शेतक-यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असला तरी राज्यकर्त्यांसाठी तो श्रेयाचा झाला आहे. श्रेय आले की घाई येते आणि घाई झाली की गडबड होते . शेतकरी कर्जमाफीचीदेखील राज्य सरकारने घाईगडबडच केली आहे. त्या मुळेच सरकार रोज कर्जमाफीचे नवनवीन ‘वायदे’ करीत आहे अशा शब्दात सामनातुन सरकारवर टिका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र हातात असलेला गरीब शेतकरी मात्र कर्जमाफीच्या या ‘वायदे’ बाजारात ‘भरलेला’ सातबारा आणि ‘कोरे’ बँक पासबुक पाहत हताशपणे उभा आहे. कर्जबाजारीपणाच्या आगीतून कर्जमाफीच्या फुफाट्यात अशी त्याची अवस्था झाली आहे.अशी टिका सामनाच्या संपादकिय मधून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफीला लागलेले समस्यांचे ग्रहण सुरूच आहे ते सुटायला तयार नाही. किंबहुना, श्रेयाची घाई कशी गडबड करते, त्याचा फटका सामान्य जनतेला कसा बसतो आणि एका ज्वलंत व जिव्हाळय़ाच्या प्रश्नाचा कसा खेळखंडोबा होतो याचे ‘उत्तम’ उदाहरण म्हणून या कर्जमाफी गोंधळाकडे पाहावे लागले. असा टोलाही सामनातुन लगावण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही पहिल्या टप्प्यात ज्या शेतक-यांची कर्जमाफी मंजूर झाली त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला असला तरी प्रत्यक्ष शेतक-यांच्या हातात अद्यापही काहीच पडलेले नाही. माहिती-तंत्रज्ञान विभागाने हिरवा कंदील दाखविलेल्या शेतकरी यादीतही तांत्रिक चुका असल्याचे कारण आता त्यासाठी दिले जात आहे. या चुकांचे पालकत्व ज्या खात्यांनी घ्यायचे ते हात वर करीत आहेत आणि कर्जमाफीची आस लागलेला शेतकरी मात्र मधल्यामध्ये भरडला जात आहे. ‘कर्जमाफी नको, पण तुमचा ऑनलाइन गोंधळ आवरा’ अशी त्याची अवस्था झाली आहे. अशा शब्दात सामनाच्या संपादकियमधून सरकारला फटकारले आहे.