कशेडी घाटाच्या बोगद्याचे काम लवकरच सुरू

कशेडी घाटाच्या बोगद्याचे काम लवकरच सुरू
 कंत्राटदाराची नेमणुक झाल्यावर अडीच वर्षात काम पुर्ण होणार.
-एकुण रुपये ५०२.२५ कोटींचे टेंडर
मुंबई  दि. २८  कशेडी घाटातून प्रवास करणे कोकणात जाणार्‍या तसेच येणार्‍यांसाठी अपघात विरहित प्रवास करणे लवकरच सुखकर होणार आहे. कशेडी घाटाच्या बोगद्याचे काम लवकर सुरू होणार असून या कामासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने याबाबतचे टेंडर काढले आहे. हे काम करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर हे सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी घाटातून प्रवास करताना वाहनांचे मोठ्याप्रमाणात अपघात होतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यातच हा घाट चढण्यासाठी तसेच उतरण्यासाठी सुमारे ३४ किलो मीटरचे अंतर वाहनांना पार करावे लागते. हे अंतर पार करण्यासाठी वाहनांना सुमारे ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. परंतु कशेडी घाटात बोगदा तयार केल्यास हे अंतर अंदाजे ५ मिनिटांमध्ये पार करणे वाहनचालकांना सहज शक्य आहे. तसेच या घाटावरील वाहनांचा प्रवास अपघात विरहित होऊ शकतो, हे रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या कामाच्या सर्वेक्षणासाठी येणारा तसेच प्रत्यक्ष कामासाठी येणारा खर्च, काम पुर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, पर्यायी वाहतुक व्यवस्था या सर्वांचा आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी या कामाच्या सर्वेक्षणासाठी तसेच सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाल्यावर ते लगेचच सुरू करण्यासाठी त्यांनी रस्ते वाहतुक व महामार्गाचे मंत्री नितिन गडकरी यांना पत्रही पाठविले. या पत्राची दखल घेत कशेडी घाटाच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाल्याने आता या या कामाच्या बोगद्याच्या कामासाठी टेंडर काढण्यात आले आहे. टेंडर भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोंबर २०१७ आहे. या कामासाठी रुपये ५०२.२५ कोटी खर्च येणार असून कंत्राटदाराची नेमणुक झाल्यावर हे काम अडीच वर्षांत पुर्ण करण्यात येणार आहे. या बोगद्याचे काम पुर्ण झाल्यावर त्या रस्त्याची डागडुजीचे काम ४ वर्षे कंत्राटदारालाच करावे लागणार आहे. तसेच या बोगद्यामध्ये जाण्यासाठी ३ व येण्यासाठी ३ अशा सहा लेन तयार करण्यात येणार असून सुमारे पावणे दोन किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या उप विभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांनी दिली. हे काम पुर्ण झाल्यावर या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांना अंदाजे ५ मिनिटांत कशेडी घाट पार करणे शक्य होणार आहे असल्याची माहिती, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री यांनी दिली.
Previous articleकर्जमाफीचा “वायदे बाजार”
Next articleराज्यात पारेषणची ८६ अतिउच्चदाब उपकेंद्रे उभारणार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here