मुंबई नगरी टीम
जालना । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.मुंबई सारख्या मोठ्या शहरातील रूग्ण संख्या अटोक्यात येत असतानाच सध्या राज्यात सुरू असलेली कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यातील कोरोना रूग्ण वाढीचा आलेख जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढला होता.मात्र जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काल राज्यात एकूण १५ हजार नवे रूग्ण आढळले तर मुंबई सारख्या मोठ्या शहरात केवळ ८०० नविन बाधित आढळून आले आहेत.रूग्ण संख्या झपाट्याने घटत असल्याने तिसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे.यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील तिसरी लाट मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाट संपेल असे भाकित केले आहे.सध्याच्या परिस्थितीत राज्यात कोणतेही निर्बंध वाढवण्याचा सरकारचा विचार नसल्याचेही सांगून यापुढेही टप्याटप्याने निर्बंध कमी केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.