मुंबई नगरी टीम
मुंबई । दहावी आणि बारावी परिक्षेचे फुटलेले पेपर आणि कॅापीचे प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गंभीर दखल घेतली असून,कॉपी पुरविण्याचे प्रकार आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल आणि पुढे अशा शाळांना दहावीचे परीक्षा केंद्र दिले जाणार नाही,अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत केली.
दहावी आणि बारावी परिक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत.शिवाय प्रश्नपत्रिका समाज माध्यमात व्हायरल केल्याचे प्रकार घडले आहेत,हा मुद्दा काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी आज उपस्थित केला होता.यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की,दहावीच्या मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान पैठण तालुक्यातील नीलजगाब येथील लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गैरप्रकाराच्या प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापक,सहशिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. बोर्डाच्या परीक्षा त्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आहेत. या परीक्षा सुरक्षितपणे पार पडाव्या आणि विद्यार्थ्यांना निर्भीडपणे सामोरे जाता यावे, यासाठी पालक, शाळा, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री गायकवाड यांनी केले.