मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.एसटी कर्मचा-यांनी पवार यांच्या निवासस्थानी चपला भिरकवल्या या घटनेचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना,काँग्रेस आणि भाजपाकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वावर निशाणा साधत पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आज दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी तीव्र आंदोलन करीत चपला फेक करून जोरदार घोषणाबाजी केली.ही घटना घडल्यानंतर याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.या घटनेचा सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला आहे.यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.यावेळी बोलताना पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला.आज येथे जे काही घडले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही.एखाद्या संघटनेचा नेता शहाणा नसेल तर त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर देखील होतो याचे हे उदाहरण आहे.राजकारणात मतभेद संघर्ष असतात पण टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही असेही पवार यावेळी म्हणाले.एसटी कर्मचारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घनिष्ठ संबंध आहेत.गेल्या ५० वर्षात एसटी कर्मचा-यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून चुकले नाही.ज्या ज्या वेळी काही प्रश्न निर्माण झाले तेव्हा तेव्हा ते सोडविण्यासाठी सर्व सहकाऱ्यांनी कष्ट घेतले.मात्र याच वेळेला एक चुकीचा रस्ता त्यांना दाखवला गेला आणि त्याचे परिणाम आज या ठिकाणी दिसत आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कारण नसताना संप करून काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आले. दुर्दैवाने काही व्यक्तींना आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागली असे सांगून,जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते,तेच नेतृत्व आत्महत्येसारख्या गोष्टीला जबाबदार असून,त्यातून जे नैराश्य आले आणि ते कुठेतरी काढले पाहिजे,म्हणून त्यांनी या ठिकाणी लश्क्ष्य करण्याचा प्रयत्न केला असेही पवार म्हणाले.