मुंबई नगरी टीम
अहमदाबाद । स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यांचे ते स्वप्न गुजरातने २७ वर्षांपूर्वी साकार केले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी बायाद आणि प्रांतिज येथे दोन जाहीर सभांना त्यांनी आज संबोधित केले. रात्री मणिनगर विधानसभा मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे. मणिनगर विधानसभा मतदारसंघाचे गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्ष प्रतिनिधीत्त्व केले आहे. प्रांतिज येथील सभेत यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा प्रचारासाठी आल्याच्या आठवणी देवेंद्र फडणवीस यांनी जागविल्या.या सभांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुजरात पूर्वी फार विकसित नव्हते.पण, नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या विकासाला एक नवा आयाम दिला. देशाचे नेतृत्त्व करीत असतानाच आज संपूर्ण विश्व मोदीजींना आपला नेता मानतोय, हे त्यांच्या कार्याचे सामर्थ्य आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये गरिबांपर्यंत पैसा पोहोचत नव्हता,शेतक-यापर्यंत पैसा पोहोचत नव्हता.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शंभर टक्के सरकारी पैसा डीबीटीच्या माध्यमांतून खर्या लाभार्थ्यांना मिळू लागला. तशी व्यवस्था मोदींनी निर्माण केली. घर, पाणी, गॅस जोडणी, वीज, किसान सन्मान निधी, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मदत, स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार, फुटपाथवर व्यवसाय करणा-यांना सुद्धा आर्थिक मदत, ज्यांच्यापर्यंत कुणी पोहोचत नव्हते, त्यांच्यापर्यंत सरकारची मदत पोहोचते आहे, हा खरा विकास आहे.
पूर्वीच्या सरकारांमध्ये बंद,कर्फ्यू, दंगे यामुळे गुजरातची जनता पीडित होती. गुजरात आज शांत आहे. नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून नवभारताची शक्ती दाखविण्याचे राजकीय कौशल्य दाखविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. आज निवडणूक गुजरातेत आणि राहुल गांधी दुस-या राज्यात फिरत आहेत. काल येऊन गेले. पण, काय बोलले हे त्यांनाही कळले नाही. त्यांना हे ठावूक आहे की, गुजरातेत येऊन काहीच फायदा नाही. कितीही प्राणी एकत्र आले तरी वाघाचा मुकाबला कुणीही करू शकत नाही. यावेळी गुजरातमध्ये भाजपा विजयाचा नवीन विक्रम स्थापित करणार, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.