मुंबई नगरी टीम
मुंबई । बुधवारी होणारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक शिंदे फडणवीस सरकारने रद्द केली आहे.एकीकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष या बैठकीकडे लागले असताना शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातच्या निवडणुकांसाठी ही बैठक रद्द करुन राज्याचे मंत्रिमंडळच गुजरात भाजपच्या दावणीला बांधले आहे.राज्याचे मंत्रिमंडळ गुजरातमध्ये भाजप कसे जिंकेल यासाठी कामाला लागले असून राज्यातील जनतेच्या प्रश्नांचा या सरकारला पूर्ण विसर पडला आहे,अशी टीका शिवसेना प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली.
खरे तर मंत्रिमंडळ बैठकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलेले असते,अनेक महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होत असतात.राज्यातील शेतकरी, बेरोजगार युवक,सरकारी नियुक्त्या,असे अनेक प्रश्न रखडलेले असताना शिंदे-फडणवीस सरकारने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मंत्रिमंडळ बैठकच रद्द केली आहे.राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सगळा विस्कळीत कारभार सुरू आहे.राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला देखील बराच कालावधील लागला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यावेळी देखील केवळ १८ मंत्र्यांनीच शपथ घेतली होती. अजूनही राज्याचा कारभार १८ मंत्र्यांवरच चालवला जात आहे. एका मंत्र्याकडे सहा-सहा खात्यांचा कारभार दिला आहे. त्यामुळे सरकारमध्ये सगळीच गोंधळाची स्थिती आहे, असे कायंदे यांनी म्हटले.
आज राज्यातील अनेक मोठ मोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात जात आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही, बेरोजगार तरुणांसाठी कोणताही ठोस निर्णय घेवून त्यांना दिलासा दिलेला नाही, अनेक अधिकाऱ्यांच्या नियु्क्त्या रखडलेल्या आहेत, अनेकांचे पगार रखडले आहेत. तसेच सरकारी नोकऱ्यांची भरती प्रक्रीया देखील खोळंबली आहे, असे अनेक प्रश्न असताना राज्य मंत्रिमंडळाची आज होणारी बैठक केवळ गुजरातच्या निवडणूकीमुळे रद्द केली, ही बाब अतिशय लाजीरवाणी आहे. मंत्रिमंडळ बैठक असली की, आपल्याबाबतील कोणता निर्णय होणार आहे याकडे आमदार, महाराष्ट्रातील जनता डोळे लावून बसलेली असते. पण या सरकारने मंत्रीमंडळ बैठक रद्द करून हे सरकार गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी कशी जिंकेल यासाठीच हे लोक काम करत आहेत, म्हणजेच सगळे मंत्रिमंडळ गुजराच्या निवडणुकीसाठी भाजपच्या दावणीला बांधले असल्याची टीका कायंदे यांनी केली आहे.