ठाकरे पवारांची पुन्हा कसोटी; विधानपरिषदेतील तब्बल २० आमदारांची मुदत संपणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या ६ खासदारांचा कार्यकाल संपल्याने कालच राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या मे जून आणि जुलै महिन्यात विधानपरिषदेतील तब्बल २० आमदारांची मुदत संपत असल्याने राज्यसभेच्या निवडणुकीपाठेपाठ विधानपरिषद निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे.पक्ष फुटीमुळे राज्यसभा निवडणुकीत ठाकरे आणि शरद पवार गटाला मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही गटाला पुन्हा एकदा कसोटीला सामोर जावे लागणार आहे.

राज्यसभेतील महाराष्ट्रातील ६ खासदारांची मुदत संपल्याने या रिक्त जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे.पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला या निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिंदे आणि अजित पवार गट भाजपसोबत गेल्याने महायुती बळकट झाली असतानाच महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने कसोटीला सामोरे जावे लागणार आहे.येत्या मे,जून आणि जुलै महिन्यात विधानपरिषदेतील २० आमदारांची मुदत संपणार असल्याने या जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. येत्या सहा महिन्यात भाजपचे ७,काँग्रेसचे २,राष्ट्रवादीचे २, शिवसेनेचे ६, शिक्षक भारती, राष्ट्रीय समाज पक्ष, आणि शेकापचे प्रत्येकी एका आमदारांची मुदत संपत आहे ( कंसात मुदत संपत असलेला दिनांक ) विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे (३१ मे), बाबजानी दुर्राणी ( २७ जुलै ),काँग्रेसचे वजाहत मिर्झा ( २७ जुलै ),प्रज्ञा सातव ( २७ जुलै ),शिवसेनेच्या मनिषा कायंदे( २७ जुलै ),नरेंद्र दराडे ( २१ जून ) ,विलास पोतनीस ( ७ जुलै ), अनिल परब ( २७ जुलै ), किशोर दराडे ( ७ जुलै ),विप्लब बाजोरीया ( २१ जून ), भाजपचे रामदास आंबटकर ( २१ जून ),विजय गिरकर ( २७ जुलै ), निरंजन डावखरे ( ७ जुलै ), सुरेश धस, ( २१ जून ),प्रविण पोटे ( २१ जून ),रमेश पाटील ( २७ जुलै ),रामराव पाटील( २७ जुलै ), तर शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील ( ७ जुलै ) , शेकापचे जयंत पाटील ( २७ जुलै ), आणि रासपचे महादेव जानकर ( २७ जुलै ) यांची मुदत संपत आहे.

मुदत संपणा-या विधानपरिषद सदस्यांमध्ये मध्ये सर्वाधिक ७ आमदार भाजपचे आहेत.त्या खालोखाल शिवसेनेचे ६ आमदार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ आमदारांची तर शिक्षक भारती, शेकाप आणि रासपचे प्रत्येकी एक आमदार निवृत्त होत आहे.शिवसेनेतील विलास पोतनीस, अनिल परब आणि किशोर दराडे वगळता बहुतेक आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानपरिषदेच्या रिक्त होणा-या २० जागांसाठी होणा-या निवडणुकीत ठाकरे आणि शरद पवार गटाला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Previous articleलोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजप प्रत्येक ” गाव ” पिंजून काढणार !
Next articleशेतकऱ्यांच्या दस्तनोंदणीद्वारे ५ कोटी पेक्षा जास्तीची शुल्कमाफी