मुंबई नगरी टीम
नाशिक । या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होणार असून मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान देखील त्यांना मिळणार नाही.कदाचित त्याची जाणीव झाल्यामुळेच आता महाराष्ट्रातील एका नेत्याने आपली दुकाने बंद करून काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला विरोधी पक्षांना दिला असून महाराष्ट्रातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील,असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या सभेत बोलताना वर्तविले. धर्माच्या आधारावर देशाच्या अर्थसंकल्पाचीही फाळणी करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा गंभीर आरोपही मोदी यांनी केला.
भाजपा-महायुतीच्या दिंडोरीच्या उमेदवार डॉ.भारती पवार,नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस,उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार खिल्ली उडविताना कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर सखोल मुक्त चिंतन केले.तुमची सेवा हेच माझ्या आयुष्याचे सर्वात मोठे ध्येय आहे. गेल्या दहा वर्षांत तुम्ही माझे काम पाहिले आहे, आज तिसऱ्या कार्यकालात विकसित भारत बनविण्यासाठी आशीर्वाद मागण्याकरिता मी तुमच्यासमोर आलो आहे, असे सुरुवातीसच सांगून मोदी यांनी देशाच्या विकासाच्या वाटचालीचे गेल्या दहा वर्षांचे एक चित्र जनतेसमोर मांडले.भाजपा -एनडीए आघाडीला प्रचंड विजय मिळणार याची जाणीव इंडी आघाडीच्या एका नेत्याला अगोदरच झाली आहे, असे शरद पवार यांचा नामोल्लेख न करता मोदी म्हणाले. निवडणुकीनंतर सारेजण एकत्र आले तर कदाचित मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान मिळू शकेल, असा त्या नेत्याचा समज आहे. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार हे नक्की आहे.जेव्हा ते घडेल, तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण नक्कीच होईल. जेव्हा आपला पक्ष काँग्रेससोबत जाईल, तेव्हा मी शिवसेनेचे दुकान बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणत असत.हे दुकान बंद होण्याची वेळ आली, असा याचा अर्थ आहे. विनाशाचा हा क्षण बाळासाहेबांना क्लेश देणारा असेल, कारण नकली शिवसेनेने बाळासाहेबांची सारी स्वप्ने धुळीस मिळविली आहेत असा हल्लाबोलही मोदी यांनी केला.
अयोध्येत भव्य राममंदिर व्हावे, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द व्हावे, ही बाळासाहेबांची स्वप्ने होती. ती पूर्ण झाली, पण याचा सर्वाधिक विरोध नकली शिवसेनेकडून सुरू आहे, असे मोदी म्हणाले. नकली शिवसेनेप्रमाणे नकली राष्ट्रवादीनेही राम मंदिर प्रतिष्ठापनेचे निमंत्रण झिडकारले. काँग्रेस आणि नकली शिवसेना यांच्यात पापाची भागीदारी असून संपूर्ण महाराष्ट्रासमोर हे पाप उघड झाले आहे, असे ते म्हणाले. ज्या काँग्रेसने वीर सावरकरांना सतत अपमानित केले, त्या काँग्रेसला खांद्यावर घेऊन नकली शिवसेना राजकारण करत आहे, असा आरोप श्री.मोदी यांनी केला. महाराष्ट्रातील जनतेचा संताप शिगेला पोहोचला आहे, पण नकली शिवसेनेला अहंकारामुळे याची जाणीवही झालेली नाही. काँग्रेससमोर गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला धडा शिकविण्याची स्वाभिमानी महाराष्ट्राची तयारी झालेली आहे, असेही ते म्हणाले.