माझी सुरक्षा काढा ! खा. सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूर येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिले असून,या पत्रात त्यांनी माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा आणि ते जनतेच्या सेवेत द्या, अशी विनंती केली आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येत आहे. त्यातच राजकीय नेत्यांना पोलिस संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे माझे पोलिस संरक्षण काढून ते जनतेच्या सेवेत द्यावे, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.राज्यात प्रंचड गुन्हेगारी वाढली आहे असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालात म्हटले आहे. महिला अत्याचाराचा विषय गंभीर होत आहे.जनता रस्त्यावर आल्यानंतर सरकारला जाग आली.महाविकास आघाडी सरकारच्या काळात शक्ती कायदा आणला त्याचे काय झाले असा सवाल सुळेंनी उपस्थित केला आहे.अनेक आजी,माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचे बळ कमी पडत असताना दुसरीकडे सुरक्षा घेणे योग्य नाही.राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे. त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावी अशी मागणी करून,माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी आणि माझ्या सुरक्षेसाठी दिलेले पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत अशी विनंती सुळे यांनी गृहमंत्री फडणवीस यांना केली आहे.

Previous article‘शक्ती कायदा’ कधी अंमलात आणणार ? अनिल देशमुखांचा सरकारला सवाल
Next articleराहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड