मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यामध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये नफा मिळणार आहे.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते.या दुकानदारांना केंद्र शासनाकडून ४५ रुपये आणि राज्य शासनाकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये नफा म्हणून दिले जात होते.या रकमेत वाढ करण्यात यावी अशी मागणी दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये असा नफा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांचा आर्थिक बोजा राज्य सरकारवर पडणार आहे.