मंत्रालयात प्लास्टिक बाटल्यांवर बंदी
मुंबई १६ प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी सरकारने या!ची अंमलबजावणी थेट मंत्रालयातूनच करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दालनात या संदर्भात आज बैठक पार पडली. लवकरच मंत्रालयातील सर्व विभागांची बैठक घेऊन कार्यालयात आणि परिसरात प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले .
केवळ मंत्रालय नाही तर सर्व सरकारी कार्यालयात प्लास्टिक बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी घातली जाणार आहे. सध्या सर्वत्र प्लास्टिक पिशव्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो . मात्र लवकरच दुधाच्या, तेलाच्या, औषधांच्या प्लास्टिक पिशव्यांना पर्यावरण पूरक पर्याय उपलब्ध करणार असल्याबाबत विचार सुरु असल्याचे कदम यांनी सांगितले .
गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक कायदे केले आहेत.मात्र काही जण या कायद्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही . कायद्याची अमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूद आहे . मात्र आता या कायद्यात ३ ते ६ महिने सजा आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पर्यावरणमंत्री कदम यांनो सांगितले . पर्यावरणाच्या दृष्टीने समाजात जाणीव निर्माण व्हावी यासाठी जनजागृती कार्यक्रमाची आखणी करण्याबरोबरच कापडी पिशव्या बनवण्यासाठी राज्यातल्या विविध महिला बचत गटांना निधीसह प्रोत्साहन देणार असल्याचे कदम यांनी सांगितले .