मुख्यमंत्री आणि ठाकरे एकाच दिवशी कोल्हापूरात! मात्र  टीकेचे प्रहार होणार ?

मुख्यमंत्री आणि ठाकरे एकाच दिवशी कोल्हापूरात! मात्र  टीकेचे प्रहार होणार ?

मुंबई दि. २१ कर्जमाफीसह अनेक मुद्द्यावर शिवसेनेने विरोधाची भूमिका घेत मुख्यमंत्र्यासह भाजपवर निशाणा साधला असतानाच येत्या शुक्रवारी आणि शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर जात आहेत. मात्र भाजप आणि शिवसेनेचे स्वतंत्र कार्यक्रम असल्याने राजकीय धुरळा उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी या दोन नेत्यांचा कोल्हापूरमध्ये मुक्काम असला तरी एकमेकांची भेट होण्याची शक्यता कमीच आहे.

येत्या २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे सातारा सांगली कोल्हापूर दौ-यावर जाणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ठाकरे यांच्या सहा जाहीर सभा होणार आहेत. कर्जमाफी आणि ऊस दराच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे आपल्या भाषणात भाजपला लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे हे आपल्या या दौ-यात शेतकरी, व्यापारी व कामगारांशी संवाद साधणार आहेत. सांगली, तासगाव व कराड येथेही त्यांच्या सभा होणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौ-यावर जाणार आहेत. कराड, कोल्हापूर, कागल येथील विविध कार्यक्रमाना उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या दौऱ्यात माजी मंत्री विनय कोरे यांची भेट घेणार असून, कोरे यांना ताकद देण्याबरोबरच वारणा ग्रुपची ताकद पक्षाबरोबर कशी येईल, याची चाचपणी करण्याची शक्यता आहे. समरजित घाटगे यांना ‘म्हाडा’चे अध्यक्षपद दिल्यानंतर विधानसभेची तयारी म्हणून कागल येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर ‘सावली’च्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, नंतर कदमवाडी येथील अॅपल हॉस्पिटलच्या नूतन सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. रात्री वारणा समुहाला भेट देणार असून, कोल्हापुरात मुक्काम आहे. २५ नोव्हेंबरला कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत‌िस्थळाला अभिवादन करून हुतात्मा साखर कारखान्यात आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल. तेथून पुन्हा ते कोल्हापूरला जाणाल असून, कागल येथे कागल बँकेच्या नामकरण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे. या बँकेला शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांचे नाव देण्यात येणार आहे. तेथूनच ते मुंबईला रवाना होणार आहेत.

उद्धव ठाकरे हे देखील २४ नोव्हेंबरला कोल्हापुर दौ-यावर जाणार आहेत. शिवसेनेच्यावतीने चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्यांची नेसरी, हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे जाहीर सभा होईल. उचगाव येथे कामगाराशी संवाद साधल्यानंतर सायंकाळी कुडित्रे येथील कुंभी कारखान्यावर त्यांची जाहीर सभा होईल. यादिवशी आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त ठाकरे यांच्या हस्ते शंभर ई-रिक्षांचे वाटप करण्यात येईल. ठाकरे कोल्हापुरात मुक्काम करणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी कोल्हापूरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते शिरोळ तालुक्याच्या दौ-यावर रवाना होणार असून, या ठिकाणच्या बसस्थानकाचे उद्‍घाटन व जाहीर सभा होणार आहे. तेथून ते सांगली जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत.सत्तेतील सहभागी पक्षाचे प्रमुख नेते एकाच वेळी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर जात असून, कोल्हापूर मध्ये या दोन नेत्यांचा मुक्काम असला तरी या दोन नेत्यामध्ये संवाद होण्याची शक्यता कमीच आहे.

Previous articleबी.टी.कापसावरील बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई द्या
Next articleविस्तार केवळ राणेंसाठी नाही; शिवसेनेच्या मंत्र्यामध्येही फेरबदल होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here