‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास झाला, भाजप संपन्न झाला !
उध्दव ठाकरे यांची टीका
मुंबई : उत्तर भारतीय आणि अन्य राज्यातून येणारे लोक मुंबईचा गौरव वाढवतात असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा मनसेचे समाचार घेतल्यानंतर शिवसेनेनेही मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मुंबईला महान बनविण्यात परप्रांतीयांचा वाटा आहे असे एक बेजबाबदार विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान करण्याची स्पर्धा अधूनमधून सुरू असते, पण त्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही उडी मारावी याचे दुःख आहे.गिरण्यांच्या जमिनीवर मराठी माणसांची थडगी उभी राहिलेली आहेत. त्या थडग्यांवर उपऱ्या धनदांडग्यांनी श्रीमंती मॉल्स व टॉवर्स उभे केले. त्या टॉवर्सकडे बघून मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान हा महाराष्ट्राचाच अपमान आहे. ‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास झाला, भाजप संपन्न झाला असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकियमधून केली आहे.
काय म्हटले आहे संपादकियमध्ये
मुंबई संपन्न आणि वैभवशाली होती म्हणून इतर प्रांतांतले लोक पोटापाण्यासाठी मुंबईत आले व संपन्न झाले. मुंबई ही आधीपासूनच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती. म्हणूनच तिला दाणे टाकण्यासाठी लाखो लोक मुंबईत आले, पण यापैकी अनेकांनी कोंबडीच मारून खाण्याचा प्रयत्न केला. गेल्या ५५ वर्षांपासून शिवसेना येथे पहारेकऱ्याच्या भूमिकेत असल्यानेच कोंबडी जिवंत आहे. मुंबई कुणाची, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत राहणाऱ्या सर्वांची आहे. ज्यांनी ज्यांनी मुंबई – महाराष्ट्राला आपले मानले व मुंबईसाठी घाम गाळला त्या सगळ्यांची आहे. मात्र मुंबई सर्वात आधी महाराष्ट्राची आहे. म्हणूनच हिंदुस्थानची आहे, पण नेमक्या याच गोष्टीकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जाते. इतकेच नव्हे तरमुंबईवरचा मराठी माणसाचा हक्कच
नाकारला जातो. घाटकोपर रेल्वे स्थानकासमोरील चौकाचे ‘शिक्षणमहर्षी आय. डी. सिंह’ असे नामकरण झाले. घाटकोपरमध्ये श्री. सिंह यांनी हिंदी भाषिकांसाठी शिक्षण संस्था उत्तमरीत्या चालविल्या व त्यांचे स्मरण म्हणून एका चौकास त्यांचे नाव दिले. मुंबईत असे सामाजिक व शैक्षणिक योगदान देणाऱ्यांचे स्मरण नेहमीच ठेवले जाते. जात, धर्म व प्रांतापलीकडचा हा विषय आहे. राम मनोहर त्रिपाठी हे मुंबईतील हिंदी भाषिकांचे सगळ्यात लाडके व हिंदी भाषिकांना मुंबई-महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणारे नेते होते. त्रिपाठी हे राज्य सरकारात मंत्री होते. मुंबईतील त्यांचे सांस्कृतिक योगदानही मोठे आहे, पण त्रिपाठी हे मुंबईतील धनदांडग्या प्रवृत्तीचे नेतृत्व करीत नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. दुधात साखर मिसळावी तसे ते येथील संस्कृतीत मिसळून गेले होते व हिंदी समाजाने तेच करावे ही त्यांची भूमिका होती. प्रांतीय मतपेढीचे राजकारण त्यांनी किंवा आय. डी. सिंह यांच्यासारख्यांनी कधीच केले नाही. आज परप्रांतीय मतांच्या जोरावर भाजप मुंबईचे राजकारण करू पाहत आहे. त्यामुळे काँगेसचीच भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून गरळ ओकल्यासारखी बाहेर पडत आहे. मुंबईच्या विकासाचा पाया घालणारे व शिखर बांधणारे मराठीच आहेत. मराठी माणसांबरोबर पारशी व दानशूर गुजराती उद्योगपती त्यात सहभागी होते.
नाना जगन्नाथ शंकरशेठ हे तर आजच्या आधुनिक मुंबईचे जनक. डॉ. भाऊ दाजी लाड हेसुद्धा आहेत. सर जमशेटजी जिजीभाई, फ्रामजी कावसजी, वाडिया यांच्यासारखे अनेक दानशूर पारशी लोक त्यावेळी मुंबईचे वैभव वाढवीत होते. नाना शंकरशेठ यांनी आपल्या कर्तृत्वाने संपत्ती मिळविली आणि मुंबईचे जीवन संपन्न करण्यासाठी ती वापरली. शैक्षणिक कार्यात भाऊ दाजी लाड यांचे काम मोठे होते. या सगळ्यांनी स्वतःची संपत्ती मुंबईच्या विकासासाठी वापरली. कारण मुंबई म्हणजे त्यांच्यासाठी फक्त सोन्याचे अंडे देणारी कोंबडी नव्हती. सध्या मात्र मुंबईचा विकास म्हणजे बिल्डर व धनिकांचे राज्य आणि त्याच पैशांतून शेठजींच्या पक्षांचे राजकारण, असा एकंदर प्रकार सुरू आहे. मुंबईचा विकास जर एवढ्यापुरताच मर्यादित असेल तर मुख्यमंत्र्यांचे विधान योग्यच व भाजपसारख्या पक्षाचा खरा चेहरा दाखविणारे आहे. मुंबईसाठी मरणारा स्वातंत्र्य सैनिक बाबू गेनू त्यांच्या खिजगणतीत नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून हुतात्मा झालेल्या १०५ लोकांचे त्यांना स्मरण नाही. येथील गिरण्यांच्या जमिनीवर आता मराठी माणसांची थडगी उभी राहिलेली दिसतात. त्या थडग्यांवर उपऱ्या धनदांडग्यांनी श्रीमंती मॉल्स व टॉवर्स उभे केले. त्या टॉवर्सकडे बघून मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान हा महाराष्ट्राचाच अपमान आहे. ‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास झाला, भाजप संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे.