कुष्ठरुग्णांच्या चांगल्या सोयीसुविधांसाठी प्रयत्न करणार
डॉ. रणजित पाटील
मुंबई : कुष्ठरुग्णांना शतकाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या मुंबईतील वडाळा येथील अॅक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुगणालयाला नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेच्या व्यवस्थेबाबत त्यांनी पाहणी केली व रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णालयाच्या समस्या जाणून घेतल्या.
प्रशासनाच्या सहाय्याने रुग्णालयातील कुष्ठरुग्णांसाठी चांगल्या सुविधा व भविष्यात चांगले जीवन जगता यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयात ३० ते ४० वर्षांपासून दाखल असलेल्या कुष्ठरुग्णांना रुग्णालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या औषधोपचाराबाबत माहिती घेऊन रुग्णांच्या व्यथा- संवेदना मंत्री महोदयांनी जाणून घेतल्या.
तसेच रुग्णालयातील संग्रहालयाला मंत्रीमहोदयांनी भेट दिली. महापालिकेशी संलग्न असलेले हे रुग्णालय कुष्ठरुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवित असल्याचे समाधान पाटील यांनी व्यक्त केले. कुष्ठरोगाबद्दल समाजात अनेक गैरसमजूती आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी रुग्णालयाद्वारे विविध आरोग्य शिक्षणपर जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचप्रमाणे कुष्ठरुग्णांना औषधोपचार, विकृतीप्रतिबंधन व रुग्णसमुपदेशन हे महत्वाचे कार्य हे रुग्णालय करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.