मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या ८४ वर्षाच्या शेतक-याची प्रकृती गंभीर
मुंबई : काल रात्री उशीरा मंत्रालयाच्या परिसरात धर्मा पाटील या ८४ वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणा-या पाटील यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
धर्मा पाटील (८४) हे शेतकरी धुळे जिल्यातील रहिवासी असून, प्रस्तावित औष्णीक वीज प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला अल्प मोबदला मिळाल्याने त्यांनी काल सोमवारी रात्री १० च्या सुमारास मंत्रालयाच्या समोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.८४ वर्षीय धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन औष्णीक वीज प्रकल्पासाठी संपादित झाली आहे. जमिनीचा पाचपट मोबदला देण्याचे सरकारचे धोरण असताना पाच एकरसाठी केवळ चार लाख रुपये मोबदला त्यांना देण्यात आले आहे. वाढीव मोबदला मिळावा यासाठी पाटील हे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारत होते. तिथे काहीच दाद न मिळाल्याने त्यांनी काल सोमवारी मंत्रालय गाठले. मंत्रालयात फे-या मारूनही काम होत नाही हे पाहून निराश झालेल्या धर्मा पाटील यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. पाटील यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसताच पोलीसांनी १०८ क्रमांकाची रुग्ण्वाहिका सेवेला बोलावून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सध्या ८४ वर्षीय धर्मा पाटील यांची प्रकृती गंभीर आहे.