मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करुन औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी
औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानाचे राज्यातच नाही तर देशभरात गोडवे गाणाऱ्या सरकारला औरंगाबादसारख्या मोठया महानगरपालिकेतील स्वच्छतेचा प्रश्न २०-२० दिवस सोडवता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनीच यात हस्तक्षेप करुन महानगरपालिका बरखास्त करावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
औरंगाबाद शहरात मागील २० दिवसापासून सुरु असलेल्या कचरा प्रश्नाला आज हिंसक वळण लागले. या गंभीर प्रश्नाबाबत आपण उद्या गुरुवारी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.कचऱ्यासारख्या प्रश्नावर गोळीबार व्हावा, लाठीचार्ज व्हावा, दगडफेक व्हावी, अश्रुधुराच्या नळकांडया फुटाव्यात यासारखे दुसरे दुर्देव नाही. २५ वर्षे सत्तेत असणारे शिवसेना-भाजप हेच पक्ष या प्रश्नाला जबाबदार आहेत. महापालिकेतील कचरा ठेकेदारांची कचरा लॉबीही जबाबदार आहे. औरंगाबाद शहरात २० दिवसापासून कचरा उचलला न गेल्यामुळे शहर बकाल झाले आहे. २० दिवसांच्या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाले आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने यात हस्तक्षेप करुन याप्रश्नी तोडगा काढावा तसेच या प्रश्नाला जबाबदार असणारी महानगरपालिका बरखास्त करुन प्रशासक नेमावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष आणि न्यायालयाने याप्रश्नी कडक कारवाई आणि तोडगा काढण्याची भूमिका घेतली असल्याची आठवण मुंडे यांनी करुन दिली.स्मार्ट सिटी ची भाषा करणा-या सरकारला साधे शहर स्वच्छ ठेवता येत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.