….. अन इस्लामपूरचे मैदान मोबाईल बॅटरीच्या उजेडाने उजळून निघाले

….. अन इस्लामपूरचे मैदान मोबाईल बॅटरीच्या उजेडाने उजळून निघाले

इस्लामपूर : हजारोंच्या गर्दीने भरलेले खचाखच मैदान, उपस्थितांच्या प्रचंड उत्साहामुळे ऐन रंगात आलेली सभा , धनंजय मुंडेंसारख्या कसलेल्या फलंदाजाचे सरकारवर सुरू असलेले घणाघाती हल्ले, आणि त्यांच्याच आवाहनानुसार हजारो मोबाईल बॅटरीच्या उजेडाने शेवटी प्रकाशमान झालेले भव्य मैदान हे गुरुवारच्या इस्लामपूर मध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेतील सभेचे वैशिष्ट्य ठरले. अन न भूतो न भविष्यती अशा एका सभेची इस्लामपूरच्या इतिहासात नोंद झाली .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेतली सांगली जिल्ह्यातील शेवटची सभा गुरुवारी इस्लामपूर या जयंत पाटील यांच्या मतदारसंघात झाली. बालेकिल्ल्यातील सभा पाटील यांनी त्यांना साजेशी अशीच अतिशय भव्य आणि विराट करून दाखवली. जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात हजारोंचा जनसमुदाय अतिशय शिस्तीत आणि तितक्याच प्रचंड उत्साहात सभेत जमला होता. राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुख मैदानी तोफ धनंजय मुंडे यांचे व्यासपीठावर आगमन होताच गर्दीला आणखीनच चेव चढला. त्यापूर्वी दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणाने वातावरण तापवले होतेच. धनंजय मुंडे भाषणाला उभे राहिले आणि जमलेल्या लोकांमधून धनुभाऊ जोरात झाले पाहिजे बघा अशी मागणी केली. त्यावर मुंडे यांनीही धूर पण काढतो अन जाळ पण काढतो बघा असे उत्तर दिले अन सभेतला जल्लोष पराकोटीला गेला.

आधीच मुलुखमैदानी तोफ असलेल्या धनंजय मुंडे यांना समोरचा अफाट जनसमुदाय आणि त्यांच्यातील उत्साह पाहून अधिकच स्फुरण चढले नेहमीच्या पद्धतीपेक्षा ही अधिक आक्रमक होत त्यांनी नरेंद्र मोदी , देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते सदाभाऊ खोत यांचा जोरदार समाचार घेतला. त्यांच्या प्रत्येक वाक्याला उपस्थितांचा मिळणारा प्रतिसाद टाळ्या आणि घोषणांचा पाऊस यामुळे सभा प्रचंड प्रचंड रंगात आली. एखाद्या रंगलेल्या अटीतटीच्या क्रिकेट सामन्यात एखाद्या फलंदाजाने शेवटच्या बॉलवर सिक्सर मारावा त्या प्रमाणे धनंजय मुंडे यांनी या आंधळ्या सरकारला उजेड दाखवण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या बॅटरीचा उजेड दाखवा असे आवाहन केले. एका क्षणात हजारो मोबाईलच्या बॅटरी च्या प्रकाशाने मैदान उजळून निघाले, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय असो अशी गगनभेदी घोषणा देत आपल्या भाषणाचा समारोप करून धनंजय मुंडे विजयी योध्द्या प्रमाणे आपल्या जागेकडे वळाले. त्यानंतर भाषणास आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांनी आज युवराज सिंग ज्या पद्धतीने ६ चेंडूवर ६ षटकार ठोकतो त्याप्रमाणे आजचे त्यांचे भाषण झाल्याचे सांगितले. सदाभाऊ खोत आणि विरोधकांचा त्यांनीही आणि त्यानंतर भाषणास आलेल्या अजित दादा पवार यांनीही प्रचंड समाचार घेत सभा गाजवली त्याचबरोबर इस्लामपूर करांच्या कायम स्मरणात राहील अशी अशा एका ऐतिहासिक सभेची नोंदही केली.

Previous articleभाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे मुंबईत जोरदार स्वागत
Next articleभाजपच्या महामेळाव्याने दसरा आणि गुढीपाडवा मेळाव्याचे विक्रम मोडीत निघणार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here