आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक
मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक उद्या आयोजित केली आहे. या बैठकीला दोन्ही सभागृहातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
सकल मराठा मोर्चाच्यावतीने राज्यात सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत प्रदिर्घ चर्चा करण्यात आली तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सर्व घडामोडींची माहिती घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार उद्या शनिवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही बैठक बोलावली असून यासाठी विधानभवनाच्या दोन्ही सभागृहातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.










