मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आरक्षण देण्यासंदर्भात ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात गट नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता आहे.मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात बोलावलेल्या गट नेत्यांच्या बैठकीत मराठा आरक्षणावर सुमारे अडीच तास चर्चा झाली.त्यानुसार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे.आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यावर दाखल करण्यात आलेले सरसकट गुन्हे तात्काळ मागे घेण्यासही सरकारने सहमती दर्शवली आहे.हे गुन्हे त्वरीत मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी या बैठकीत केली.
आज विधानभवनात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, शिक्षणंत्री विनोद तावडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते,पर्यावरणमंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शरद रणपिसे, अनिल परब, कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.
आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांवरील सरसकट गुन्हे तात्काळ मागे घ्या, भरती बाबत भूमिका स्पष्ट करा, विभाग निहाय जागा , राखीव जागांचा तपशील येत्या दोन दिवसात जाहीर करा अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या बैठकीत करून,अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना व्याज अनुदान योजनेपेक्षा कर्ज अनुदान योजना जाहीर करून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्या अशीही मागणी त्यांनी केली. मागास वर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्याच्या आत घेवून त्या आधारे १६ टक्के आरक्षण देवून ते आरक्षण घटनेच्या ९ व्या परिशिष्टात टाकण्यासाठी घटना दुरुस्ती करा म्हणजे ते न्यायालय रद्द करू शकणार नाही असेही मुंडे या बैठकीत म्हणाले.गंभीर प्रकरणात संयम महत्वाचा असतो , मंत्र्यांना भडकावू वक्तव्य करण्याबाबत समज द्या अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बैठकीतच टोला लगावल्याचे समजते.











