आरक्षणासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणार : मुख्यमंत्री

आरक्षणासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणार : मुख्यमंत्री

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मान्यवरांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने आज मराठा समाजातील मान्यवरांची महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केली होती.मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
आदोलनादरम्यान हिंसा होऊ नये त्याचबरोबर कोणीही आत्महत्येचे टोकाचे पाऊल  उचलू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मराठा समाजाला निश्चित वेळेत आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर सांगितले. तसेच राज्यात लवकरच शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ‘मराठा समाजातील मान्यवरांनी आज झालेल्या बैठकीत अनेक सूचना केल्या. त्या सूचनांचा सरकारकडून नक्की विचार केला जाईल.असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा समाजाचे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी  मराठा समाजातील मान्यवरांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे ,अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, उद्योजक भैरवनाथ ठोमरे, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, सुवर्ण कोकण संस्थचे डॉ. सतीश परब आदी
उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीला अनेक मराठा समाजातील मान्यवरांना  देखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. तर या चर्चेशी आमचा कसलाही संबंध नसल्याचे मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट आहे.

या बैठकीनंतर दादर येथिल वसंत स्मृती येथे राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित होणा-या बैठकीत मराठा समाजाचे आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आढावा घेतला जाणार असल्याचे समजते.

Previous articleसांगली- मिरज- कुपवाड आणि जळगाव मध्ये ५७ टक्के मतदान
Next articleराज्यात बदलाचे वारे वाहू लागले : नवाब मलिक