युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ : मुख्यमंत्री
मुंबई : तीन राज्यात भाजपला जनतेने नाकारल्यानंतर महाराष्ट्रात भाजपने शिवसेने विषयी मवाळ धोरण स्वीकारल्याचे चित्र असून, आगामी निवडणूकीत मतांमध्ये विभागणी होऊ नये यासाठी शिवसेना भाजपची युती व्हायला हवी असे सांगतानाच शिवसेनेशी युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. आम्ही एकत्र लढलो तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल असे भाकित त्यांनी वर्तविले.
टिव्ही नाईन या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र महामंथन या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. गेल्या चार वर्षात झालेल्या निवडणूकांमध्ये भाजप सातत्याने पहिल्या क्रमांकावर राहिला आहे असे सांगतानाच आगामी निवडणूकीमध्ये मतांमध्ये विभागणी होऊ नये यासाठी शिवसेना भाजपची युती व्हायला हवी. राजकीय वास्तविता हीच असून, आम्ही दोन्ही पक्ष वेगळे लढलो तर काँग्रेस-राष्ट्रवादीला याचा फायदा होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राजकारणात आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत, आम्ही भाऊ आहोत त्यात मोठा कोण आणि लहान कोण हे माध्यमांनी ठरवावे मात्र येणाऱ्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असून,युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही एकत्र लढलो तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड आदर आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत आम्ही वेगळे लढलो तरी बाळासाहेबांवर टीका नाही हे मोदींनी पहिल्या सभेतच जाहीर केले होते अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. धनगर आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीची शिफारस अंतिम टप्प्यात आहे.लवकरच केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देण्याची शिफारश केली जाईल असे सांगून,आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कोणत्याही समाजाचे असो सर्वांना पुढे घेऊन जाणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र होणार नाहीत तर या दोन्ही निवडणूका वेगवेगळ्या होतील असेही ते यावेळी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीससंदर्भात बोलताना ते म्हणाले की, माझ्यावरील सगळे गुन्हे हे राजकीय असून इतर कोणताही गुन्हे नाहीत.सर्वोच्च न्यायालयाचा वापर करून बदनामीचा प्रयत्न केला तरी सत्य लोकांसमोर येणार आहे.
तीन राज्यात भाजपाला मिळालेल्या अपयशाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचा भाजपवर विश्वास आहे देशात नरेंद्र सरकार आणि राज्यात आमचे सरकार नक्की येणार आहे.छत्तीसगडमध्ये काँग्रेसने मोठ्या प्रमाणात खोटी आश्वासने दिली तर मध्यप्रदेशात काँग्रेसपेक्षा भाजपला जास्त मते मिळाली आहेत. देशात काँग्रेसची लाट वैगेर काही नाही, मध्यप्रदेशात निसटता पराभव भाजपला सहन करावा लागला.राजस्थानमध्येही भाजप आणि काँग्रेसच्या मतदानात किंचित फरक असल्याचे स्पष्ट करतानाच आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाला जास्त जागा मिळतील असे भाकित वर्तविले.२०१९ मध्ये मोदींचा चेहराही राहणार आणि राज्यात माझा चेहरा राहणार असेही ते म्हणाले.










